मोठी बातमी! महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटणार?; मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस, पवार आज दिल्लीत
पुणे : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या असून, अजूनही महायुतीमधील जागावाटपाचा तिढा काही सुटला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची आज दिल्लीत बैठक होणार आहे.
या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे ही अंतिम बैठक असून, त्यानंतर जागावाटपाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे महायुतीची दिल्लीतील आजची बैठक महत्वाची समजली जात असून, या बैठकीला अमित शाह देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्रित महायुतीत निवडणूक लढवणार आहेत.
मात्र, महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय होत नसल्याने शिवसेना आणि अजित पवारांनी अजूनही आपले उमेदवार जाहीर केलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण १० मतदारसंघावरून महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कायम आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत आज अंतिम निर्णय घेऊन जागावाटपाचा तिढा सोडवला जाण्याची दाट शक्यता आहे.