राज्यातील ‘मयत’ सातबारा आता ‘जिवंत’ होणार, जनतेला मोठा फायदा, जाणून घ्या काय आहे मोहिम..

मुंबई : राज्यातील ‘मयत’ सातबारा आता ‘जिवंत’ होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही अनोखी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहे. सातबारा वरील सर्व मयत खातेदारांच्या ऐवजी वारसांची नावे नोंदवण्यात येणार आहे.
येत्या १० मे पर्यंत राज्यातील सर्व सातबारा अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सर्व जिल्ह्यात ‘जिवंत सातबारा मोहीम’ राबविण्याचे आदेश देण्यात आले आहे. तहसीलदारांची समन्वय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहे. मयतांची नावे सातबाऱ्यावरून हटवून त्यांच्या वारसदाराची नावे सातबारावर लावण्यात येणार आहे. राज्यातील सातबारा अद्ययावत होणार आहे.
तर मृत व्यक्तीच्या सातबारा ची वारसा हक्काला नावे लावताना वारसदारांना सध्या अतिशय कटकटींना सामोरे जावे लागते. तलाठ्यापासून तहसीलदारापर्यंत होत असलेली ओढाताण यामुळे शेतकरी देखील हैराण होतात.. यात पैसेही जातात आणि मानसिकता ही खर्च होते.. या सर्वावर उतारा आहे तो जिवंत सातबाराचा!
याची लिटमस चाचणी एक मार्च पासून बुलढाणा जिल्ह्यात घेण्यात आली. त्याचे दृश्य परिणाम लक्षात घेत आता राज्यभर हा जिवंत सातबारा मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये जे सातबारा धारक शेतकरी निधन पावलेले आहेत, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, अशा सर्व शेतकऱ्यांची नोंदणी गावागावात घेतली जाणार असून या मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया तातडीने केली जाणार आहे.
या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात एक ते पाच एप्रिल यादरम्यान गावातील तलाठी त्याच्या हद्दीतील गावांमध्ये चावडी वाचन करेल आणि न्यायप्रविष्ठ असलेली प्रकरणे वगळता त्या गावातील मयत सातबारा धारकांची यादी तयार करेल. सहा ते वीस एप्रिल दरम्यान वारसा नोंदी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांची यादी तलाठी कार्यालयासमोर लावून याच दरम्यान ही सर्व कागदपत्रे तलाठी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करेल.
एखाद्या मृत्यूची नोंद नसेल तर स्वयंघोषणापत्र पोलीस पाटील किंवा सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला वारसांची सर्व नावे पत्ते दूरध्वनी त्यांचा रहिवासी पुरावा अशी कागदपत्रे सादर केल्यानंतर हे वारसाचे ठराव तलाठ्यांनी मंडल अधिकाऱ्यामार्फत ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करायचे आहेत.
कशी असेल ‘जिवंत सातबारा मोहीम’?
१ ते ५ एप्रिल दरम्यान तलाठी हे गावात चावडी वाचन करतील.
न्यायप्रविष्ट प्रकरण सोडून गाव निहाय मयत खातेदारांची यादी तयार करतील.
६ ते २० एप्रिल दरम्यान वारसा संबंधित कागदपत्रे तलाठींकडे सादर करता येतील.
स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी हे वारस ठराव ई-फेरफार प्रणाली मध्ये मंजूर करतील.
२१ एप्रिल ते १० मे दरम्यान तलाठी यांनी ई-फेरफार प्रणाली मध्ये वारस फेरफार तयार करावा.
त्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांनी वारस फेरफारवर निर्णय घेऊन सातबारा दुरूस्त करावा.
जेणेकरून मयत व्यक्तीच्या ऐवजी सातबारावर जिवंत व्यक्तींची नावे येतील.