समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाची तारीख ठरली! पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ‘या’ दिवशी होणार लोकार्पण..

मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. ७०१ किलोमीटर लांबीच्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे लोकार्पण २ मे रोजी होऊ शकते, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) एका वरिष्ठ अधिका-याने दिली आहे.
तसेच नागपूर ते इगतपुरीपर्यंतच्या ६२५ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गावर वाहतूक सुरू होऊन त्याच्या ७६ किलोमीटरच्या अंतिम टप्प्यात म्हणजे इगतपुरी-अमाने (ठाण्याजवळ) पर्यंतचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.
हे काम पूर्ण झाल्यामुळे वाहनचालक नागपूर ते ठाणे हे अंतर केवळ ७ ते ८ तासांत आणि मुंबई आणखी काही तासांत गाठणे शक्य होणार आहे. एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहिती नुसार, समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा तयार करणे खूप कठीण होते.
महामार्गाचा हा टप्पा सह्याद्री पवर्तरांगेतून जातो. ७६ किलोमीटरमधून ११ किलोमीटरचा हा रस्ता भुयारी आहे. यातील सर्वांत लांब भुयार ८ किलोमीटरचे आहे. इगतपुरीजवळील हा भुयारी रस्ता जगातील सर्वांत लांब आणि रुंद भुयारी रस्त्यांपैकी एक आहे.
दरम्यान,याशिवाय या महामार्गाचा जवळपास ११ किलोमीटर रस्ता एलिव्हेटेड आहे. यामुळे वाहनचालकांना कसारा घाटाच्या वळणदार रस्त्यावरून प्रवास करावा लागणार नसून ते पुलावरून प्रवास करू शकतील.
अंतिम टप्प्याबाबत माहिती पुढील प्रमाणे..
इगतपुरी-अमानेपर्यंतचे अंतर : ७६ किलोमीटर, भुयारी रस्त्याची एकूण लांबी : ११ किलोमीटर, इगतपुरी भुयाराची लांबी : ८ किलोमीटर (खूप लांब) व्हाया डक्टची लांबी : ११ किलोमीटर, सर्वांत लांब व्हायाडक्ट : २.३ किलोमीटर, सर्वांत उंच व्हायाडक्ट पिलर : ८४ मीटर (२० मजली इमारतीसारखा, सध्या नाशिक ते ठाणे जाण्यास लागणारा वेळ : ३.५ तास, समृद्धी महामार्गाने अंदाजे प्रवासाचा कालावधी : १ तास.