भाजपने मला तोंड उघडायला लावू नये; सुप्रिया सुळेंचा थेट इशारा, विधान परिषदेतील घोडेबाजारावरून हल्लाबोल

मुंबई : विधान परिषद निवडणुकीनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाने हे आरोप फेटाळून लावत विरोधकांकडे आवश्यक मतसंख्या नसल्यामुळे त्यांच्या उमेदवारांनी माघार घेतल्याचा दावा केला आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर गंभीर आरोप करत थेट इशारा दिला आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी, भाजपने मला तोंड उघडायला लावू नये. मी सुसंस्कृतपणे बोलते, पण घोडेबाजारात काय आणि कसं घडलं हे मला देखील माहीत आहे. गरज पडली तर पुरावेही देईन, असे वक्तव्य केले.
विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा आणि उमेदवारांवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. काही उमेदवारांना अमिष दाखवण्यात आले, तर काहींना विविध प्रकारच्या दबावाला सामोरे जावे लागल्याचा दावा करण्यात येत आहे.

सुळे यांनी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची गरज व्यक्त करत घोडेबाजार रोखण्यासाठी संसदेत स्वतंत्र विधेयक आणणार असल्याची घोषणाही केली. सरपंचापासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांमध्ये घोडेबाजार, पैशांचा प्रभाव किंवा तपास यंत्रणांची भीती याला आळा बसला पाहिजे. लोकशाही अधिक पारदर्शक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याने या निवडणुकीभोवती निर्माण झालेला राजकीय वाद आणखी तीव्र झाला असून, सुळे यांच्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.