बिबट्यांचे हल्ले वाढल्याने प्रशासनाने घेतला मोठा निर्णय! राज्यातील शाळेच्या वेळेत बदल, जाणून घ्या..


पुणे : सध्या राज्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचे हल्ले वाढल्याने ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात तर अनेक ठिकाणी बिबट्यांच्या हालचाली आणि हल्ल्यांच्या घटनांनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

सध्या हिवाळा सुरू झाल्यामुळे लवकर अंधार पडू लागला असून यामुळे शाळेतून घरी परतताना विद्यार्थ्यांना अंधारात प्रवास करावा लागत होता. या काळात बिबट्यांच्या हालचालीही वाढत आहेत. यामुळे प्रशासनाने बिबट्यांचा वावर असलेल्या शाळांच्या वेळेत तत्काळ बदल करण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी निर्णय घेतला आहे.

या सर्व परिस्थितीचा विचार करून बिबट्याप्रवण क्षेत्रातील शाळांची वेळ बदलण्यास परवानगी देण्यात आली आहे. आता शाळा सकाळी ९:३० ते दुपारी ४:०० या वेळेत चालवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पारनेर नगर आणि इतर ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांत बिबट्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

       

विद्यार्थ्यांनी अंधार पडण्यापूर्वी घरी पोहोचावे हा या निर्णयाचा उद्देश आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या मंजुरीनंतर नवी वेळ तात्काळ लागू करण्यात येणार आहे. अनेक विद्यार्थी शाळा घरापासून काही किलोमीटर अंतरावर असताना ऊस शेती, जंगल, डोंगराळ किंवा विरळ लोकवस्ती असलेल्या रस्त्यांवरून प्रवास करतात.

सध्या ऊस तोडणीच्या हंगामामुळे उसाची दाटी कमी झाल्याने बिबट्यांना बाहेर पडावे लागत आहे. यामुळे हल्ले वाढले आहेत. यामुळे आता सकाळी व संध्याकाळी असुरक्षित भागांमध्ये मुलांना एकटे पाठवू नये, त्यांना सोबत करावे, अशा सूचना पालकांना दिल्या जाणार आहेत. यामुळे याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!