मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी तुळजाभवानी मातेची मूर्ती इतर ठिकाणी हलवणार, मंदिर प्रशासनाचा निर्णय….


तुळजापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत तुळजाभवानीच्या मुख्य मंदिराची नव्याने बांधणी होणार आहे. दोन वर्षे देवीची मूर्ती दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराची नव्याने उभारणी केली जाणार आहे. आई तुळजाभवानीच्या मुख्य गाभाऱ्याचा आकार वाढविण्याच्या हालचाली सुरू आहेत.

तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यासह शिखराची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. या मंदिराचे नाव संरक्षित पुरातन वास्तूत असल्याने हे काम पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. गाभाऱ्याची जागा तेवढीच राहील. या मंदिराच्या बांधकामाला दोन वर्षे देखील लागू शकतात.

त्यामुळे तोपर्यंत या मंदिरातील आई भवानी मातेची मूर्ती दोन वर्षे इतरत्र हलविण्यात येणार आहे’, असे राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले. याबाबत परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तुळजाभवानीच्या मंदिराची पाहणी केली.

या पाहणीनंतर तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यासह शिखराची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तुळजापूरचे आमदार तुळजाभवानी मंदिराचे ट्रस्टी राणा जगजितसिंह पाटील यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान, तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरू आहे.

या दृष्टीने मंदिराच्या शिखराच्या दुरुस्तीचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मंदिरातील टाईल्स काढताना शिखराचा भार पेलणाऱ्या चार बीमपैकी दोन बीम जीर्ण झाल्याचे आढळले. यामुळे मंदिराच्या गर्भगृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले, यामुळे येणाऱ्या काळात काम सुरू होईल.

दरम्यान, भाविकांना देवीच्या दर्शनासाठी कोणती व्यवस्था करता येईल. धार्मिक विधी कशा प्रकारे पार पडतील, तसेच दर्शनासाठी भक्तांना कमीत कमी त्रास होईल याची सोय कशी करता येईल, याबाबतचा अहवाल तयार करून जनतेसमोर ठेवण्यात येईल’ असेही सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!