पुण्यात तापमानाने तोडले सगळे रेकॉर्ड! एप्रिल महिन्यातील तिसरे सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद, लोहगावमध्ये 42.7 अंश सेल्सिअस..

पुणे : सध्या राज्यात उष्णेतेने आपलं डोकं वर काढलं असून मंगळवारी अकोला येथे राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ४४.१ अंश सेल्सिअस नोंद झाली. विदर्भातील बहुतांश ठिकाणचे कमाल तापमान ४० अंशाच्या वर गेले आहे. मंगळवारी पुणे शहरात देखील दिवसभर उन्हाचा प्रचंड चटका जाणवत होता.
या वर्षीतील एप्रिल मधील सर्वाधिक कमाल ४१.३ अंश सेल्सिअस तापमानाची मंगळवारी नोंद झाली. पुण्यातील एप्रिल महिन्यातील आजवरचे सर्वाधिक कमाल तापमान ४३.३ अंश सेल्सिअस ३० एप्रिल १८९७ रोजी नोंदविण्यात आले आहे. यामुळे येणाऱ्या काळात अजूनच मोठ्या प्रमाणावर उष्णता वाढणार आहे.
पुणे शहरात सर्वाधिक कमाल तापमान कोरेगाव पार्क येथे ४१.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून सर्वात कमी कमाल तापमान लवासा येथे ३७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. लोहगाव येथे मंगळवारी ४२.७ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. सोमवारीही कमाल तापमान ४२.२ अंश सेल्सिअस होते.
पुणे शहराचे एप्रिल महिन्यातील सरासरी कमाल तापमान ३७.६ अंश सेल्सिअस आहे. वाढत्या शहरीकरणामुळे कमाल व किमान तापमानात मोठी वाढ होताना दिसत आहे. यापूर्वी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्या वर्षातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद होताना यापूर्वी दिसत असे. यावर्षी मात्र चित्र वेगळे आहे. आतापासूनच घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे.
असे असताना यंदा मात्र, एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात कमाल तापमान ४१ अंशाच्या पुढे गेले आहे. यापूर्वी २९ एप्रिल २०१९ रोजी कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. आतापर्यत बघितले तर ६ एप्रिल २०२१ ला – ३९.६, १७ एप्रिल २०२० ला – ४०.१, २९ एप्रिल २०१९ – ४३, ३० एप्रिल २०१३ – ४१.३, ३० एप्रिल १८९७ – ४३.३ (आतापर्यंतचे सर्वाधिक) अशी नोंद झालेली आहे.