‘तुझे आईबाप मरून जातील’; चौथीतील विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार, शाळेत लवकर बोलावून करायचा घृणास्पद कृत्यं..

जळगाव : धरणगाव तालुक्यातील एका शाळेत मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चौथीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने तब्बल दोन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

आरोपी शिक्षकाच्या धमक्यांमुळे पीडित मुलगी गप्प होती. मात्र प्रकृती बिघडल्यानंतर तिने अखेर आपली आपबीती सांगितली आणि हा धक्कादायक प्रकार उघड झाला.
नंदलाल नारायण मराठे असे आरोपी शिक्षकाचे नाव असून त्याच्याविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात POCSO कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पीडित मुलगी ही आपल्या कुटुंबीयांसह धरणगाव तालुक्यातील एका गावात राहते. ती जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकत आहे. संशयित आरोपी शिक्षक नंदलाल मराठे हा तिला शाळा भरण्यापूर्वी सकाळी दहा वाजता झाडू मारण्याच्या बहाण्याने शाळेत बोलावून घेत असे. कुणी नसल्याचा फायदा घेऊन तो तिच्यासोबत घृणास्पद कृत्य करायचा. इतकेच नव्हे तर तिला मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिचे लैंगिक शोषण करत असे.

३० एप्रिल २०२६ रोजी शाळेच्या शेवटच्या दिवशीही या नराधम शिक्षकाने तिच्यावर अत्याचार केला होता. दरम्यान, शाळेला उन्हाळी सुट्टी लागल्यानंतर पीडित मुलगी सुट्यांमध्ये मावशीकडे गेली होती. तिथे तिची तब्येत बिघडली आणि तिने जेवण करणं बंद केलं.
नातेवाईकांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने रडत रडत तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. हा शिक्षक मागील दोन वर्षांपासून सातत्याने मुलीचे लैंगिक शोषण करत होता.
या प्रकाराला विरोध केल्यास तो तिला मारहाण करायचा आणि कोणाला सांगितल्यास तुझे आई-वडील मरून जातील, अशी धमकी देऊन तिला गप्प बसवत असे, असे संबंधित पीडित मुलीचं म्हणणे आहे.