Tamil Nadu Rain : तामिळनाडूत अवकाळी पावसाचा कहर, महापुरामुळे शेकडो घरे पाण्याखाली; शाळा-कॉलेज बंद, गाड्याही रद्द..

Tamil Nadu Rain : मिचाँग चक्रीवादळाच्या तडाख्यातून सावरत असलेल्या तामिळनाडूत पुन्हा एकदा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या २४ तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धुव्वाधार पाऊस झाला आहे.

यामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आले असून शेकडो घरे पाण्याखाली गेली आहेत. या पूरस्थितीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. महापुराची परिस्थिती पाहता तामिळनाडु सरकारने अनेक जिल्ह्यांमधील शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जारी केली आहे. तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. Tamil Nadu Rain
तामिळनाडूतील चार जिल्हे अतिवृष्टी आणि पूरसदृश परिस्थितीमुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. हे चार जिल्हे म्हणजे तिरुनेलवेली, तुतीकोरीन, तेनकासी आणि कन्याकुमारी. तुतीकोरीन जिल्ह्यातील तिरुचेंदूर येथे पहाटे दीड वाजेपर्यंत अवघ्या १५ तासांत ६० सेंटीमीटर पाऊस झाला. तिरुनेलवेली जिल्ह्यातील पलायमकोट्टई येथे २६ सेमी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, कन्याकुमारीत १७.३ सेमी पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे बाधित जिल्ह्यांमध्ये सोमवारी (ता.१८) सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या काळात शाळा, महाविद्यालये, बँका, खाजगी आस्थापना आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या देखील बंद राहतील. Tamil Nadu Rain

केवळ मुसळधार पाऊसच नाही तर धरणातून सोडण्यात आलेले पाणीही लोकांसाठी अडचणीचे ठरले आहे. पापनासम, पेरुंजानी आणि पेचुपराई धरणातून पाणी सोडण्यात आल्याने तिरुनेलवेली, थुथुकुडी आणि कन्याकुमारी जिल्ह्यातील अनेक भाग गुडघाभर पाण्यात बुडाले आहेत.