महिलेला प्रवासातच गाठले; १२ लाख रुपये किमतीचा ऐवज महिलांनीच लांबविला; उरुळी कांचन ते कुंजीरवाडी प्रवासादरम्यान घडला प्रकार…


लोणी काळभोर : गौरी-गणपतीनिमित्त बीड जिल्ह्यातील माहेरी गेलेल्या महिलेच्या बसप्रवासादरम्यान बॅगेतील सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याची घटना उरुळी कांचन ते कुंजीरवाडी दरम्यान घडली.

बसमध्ये चार अनोळखी महिला चढल्यानंतर काही वेळातच महिलेच्या बॅगेतील लहान पर्समध्ये ठेवलेला दागिन्यांचा स्टीलचा डबा गायब झाल्याचे उघडकीस आले. या डब्यातील सुमारे आठ तोळे सोन्याचे दागिने आणि १० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने, असा चालू बाजारभावानुसार १२ लाखांहून अधिक रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

याप्रकरणी आश्विनी मोकिंद बादाडे (वय ३२, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ‌प्रदीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बादाडे या गौरी-गणपतीनिमित्त १७ सप्टेंबर रोजी कुटुंबासह बीड जिल्ह्यातील काडी वडगाव येथे गेल्या होत्या. पाच दिवस मुक्काम केल्यानंतर २२ सप्टेंबर रोजी सकाळी त्या पुण्याकडे परतण्यासाठी निघाल्या. किल्ले धारूर येथून इंदापूर आगाराच्या धारूर-स्वारगेट एसटी बसने त्या पुण्याकडे प्रवास करीत होत्या.

केज, कळंब, येरमळा, बार्शी, कुर्डुवाडी, टेंभुर्णी व इंदापूरमार्गे बस उरुळी कांचन येथे पोहोचल्या. उरुळी कांचन येथे तीन ते चार अनोळखी महिला बसमध्ये चढल्या.

जागा उपलब्ध असतानाही त्या बादाडे यांच्या सीटजवळच येऊन थांबल्या. त्यापैकी दोन महिला सीटजवळ खाली बसल्या, तर एक महिला पुढे आणि दुसरी मागे उभी राहिली. याचदरम्यान एका महिलेने बादाडे यांच्या पायाजवळ ठेवलेल्या बॅगेवर तोल गेल्याचे सांगत पडण्याचा बहाणा केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

काही वेळानंतर बादाडे या कुंजीरवाडी येथील मराठे हॉस्पिटलसमोर बसमधून उतरल्या. घर जवळ असल्याने त्या कुटुंबासह पायी घरी गेल्या. सायंकाळी चारच्या सुमारास त्यांनी बॅग उघडून पाहिली असता लहान पर्सची चैन उघडी असल्याचे आढळले. पर्स तपासल्यानंतर त्यातील सोन्या-चांदीचे दागिने ठेवलेला स्टीलचा डबा गायब असल्याचे निदर्शनास आले.

चोरीला गेलेल्या ऐवजात गंठण, नेकलेस, अंगठ्या, झुमके, सोन्याची चैन, बाळी, टॉप्स, सोन्याचे मणी तसेच चांदीचे पैजण यांचा समावेश आहे. या ऐवजाची चालू बाजारभावानुसार किंमत १२ लाखांहून अधिक रुपये होती. याप्रकरणी त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

उरुळी कांचन ते कुंजीरवाडी या बसप्रवासादरम्यानच चोरी झाल्याचा संशय असून, बसप्रवासात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या टोळीने ही चोरी केली असावी, या दिशेने पोलिस तपास करीत आहेत. बसमधील सीसीटीव्ही फुटेज, संशयित महिलांच्या हालचाली तसेच त्यांच्या ओळखीचा माग काढण्याचे काम सुरू आहे. संबंधित महिला पुन्हा दिसल्यास आपण त्यांना ओळखू शकतो, असेही बादाडे यांनी पोलिसांना सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!