लोणी काळभोर येथील भाजी मंडईत महिलांमध्ये फ्री-स्टाईल; तिघींवर गुन्हा दाखल…

लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील बाजार मैदानातील भाजी मंडईत तीन महिलांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान धक्काबुक्की, मारहाण आणि शिवीगाळीत झाल्याची घटना मंगळवारी (ता. २२) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत एकमेकींना धक्काबुक्की व हाताने मारहाण केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जयश्री सुनील देसर्डा (वय ५०), ज्योती तेजस देसर्डा (वय २९) आणि मीरा रामप्रसाद मंत्री (वय ५२, सर्व रा. पालखीस्थळ, लोणी स्टेशन, लोणी काळभोर) अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. याप्रकरणी महिला पोलिस हवालदार कविता संपत साळवे यांनी सरकारतर्फे लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजार मैदानातील भाजी मंडईत संबंधित तीन महिला एकमेकींशी वाद घालत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. वाद वाढल्यानंतर तिघींमध्ये धक्काबुक्की झाली. तसेच एकमेकींना हाताने मारहाण करून शिवीगाळ करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


या प्रकारामुळे भाजी मंडई परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी कारवाई करून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर तिन्ही महिलांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी तिन्ही महिलांविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संजय शिंदे करीत आहेत.