फटाके फोडणार असाल तर सावधान! लेझर, डीजेवरही कोर्टाचा कडक दणका; उत्सव मंडळांना मोठा आदेश

मुंबई : गणेशोत्सव आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर ध्वनी व वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. सार्वजनिक रस्ते आणि ठिकाणी उत्सवादरम्यान फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यासोबतच लेझर लाईट, अतितीव्र प्रकाशझोत आणि बीमच्या वापरावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
न्यायालयाने उत्सव मंडळांना ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. मंडप आणि मिरवणुकीच्या ठिकाणी दृश्यमान ध्वनीमापक यंत्र बसवावे लागणार असून, आवाजाची पातळी ठरलेल्या मर्यादेपेक्षा वाढणार नाही याची खात्री करावी लागणार आहे. ध्वनिवर्धक यंत्रणांमध्ये आवाज नियंत्रित करणारी अंतर्गत यंत्रणाही असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी आयोजकांकडून सुरक्षा ठेव घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गट किंवा मंडळांसाठी एक लाख रुपये, तर व्यक्तींसाठी ५० हजार रुपयांची सुरक्षा ठेव ठेवावी लागणार आहे. ध्वनीची मर्यादा ओलांडल्यास ही रक्कम जप्त होऊ शकते. नियम मोडणारी ध्वनियंत्रणा तात्काळ जप्त करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.


मिरवणुकीदरम्यान ध्वनीची पातळी मोजून त्याची नोंद ठेवण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर असेल. तसेच मंडळांनी ध्वनिवर्धक आणि मिरवणुकीसाठी घेतलेल्या परवानग्या सार्वजनिकपणे दाखवणे आवश्यक आहे. एकाच परिसरात अनेक मिरवणुका किंवा कार्यक्रमांना परवानगी देताना एकत्रित ध्वनीप्रदूषणाचाही विचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, नागपूर खंडपीठासमोरही डीजे आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आला. निर्बंध असतानाही डीजे वापरणाऱ्या गणेश मंडळांची परवानगी रद्द का केली जात नाही, असा सवाल न्यायालयाने पोलिसांना केला. नागपूरमध्ये मोठ्या आवाजातील डीजेवर आधीच निर्बंध लागू आहेत.
उत्सव साजरे करताना नागरिकांच्या आरोग्याचा आणि शांततेचा विचार करण्यावर न्यायालयाने भर दिला आहे. त्यामुळे यंदाच्या उत्सवांमध्ये फटाके, लेझर आणि मोठ्या आवाजाच्या ध्वनियंत्रणांबाबत पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.