भारतीयांची मान उचवणारी बातमी! सुवर्णवेधी नीरज पुन्हा अव्वल; जागतिक क्रमवारीत पटकावलं पहिलं स्थान…

मुंबई : भारताचा सुवर्णवीर नीरज चोप्रानं पुन्हा एकदा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा आता भालाफेकच्या क्रमवारीत नंबर 1 खेळाडू बनला आहे. सोमवारी (ता.२२) त्याने ही कामगिरी केली.
जागतिक ॲथलेटिक्सनं नवी क्रमवारी जाहीर केली आहे, ज्यामध्ये नीरज चोप्रा पुरुषांच्या भालाफेक रँकिंगमध्ये नंबर-1 बनला आहे. या भारतीय स्टारनं पहिल्यांदाच हे मानांकन मिळवून इतिहास रचला आहे. नीरज चोप्राला पहिल्यांदाच या किताबाने नावाजलं जाणार आहे. प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी हा सुवर्णक्षण आहे. नीरज ने पुन्हा एकदा देशाचं नाव उज्वल केलं आहे.
जागतिक ॲथलेटिक्सच्या ताज्या क्रमवारीनुसार, नीरज चोप्राचे सध्या 1455 गुण आहेत, जे सध्याच्या जगज्जेत्या अँडरसन पीटर्सपेक्षा 22 गुणांनी अधिक आहेत. भालफेकच्या जागतिक क्रमवारीत नीरजनं ग्रॅनडाच्या अँडरसन पीटर्सला मागे टाकलं असून अँडरसनचे सध्या 1433 गुण आहेत. टॉप-5 रँकिंगमध्ये पाकिस्तानचा अर्शद नदीमही आहे.
ऑलिम्पिक विजयानंतर, नीरज चोप्रानं विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतोय, नीरजचा उद्देश त्याच्या कामगिरीला अधिक उन्नत करणे आणि जगातील अव्वल भालाफेकपट्टूंपैकी एक म्हणून त्याचे स्थान मजबूत करणे हा आहे. तो भारतातील आणि जगभरातील महत्त्वाकांक्षी खेळाडूंसाठी एक प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि प्रेरणास्थान बनला आहे.