राज्यसभेच्या एका जागेसाठी महायुतीत ‘सस्पेन्स’! भुजबळ की नवनीत राणा? प्रफुल्ल पटेलांच्या बंगल्यावर मध्यरात्रीपर्यंत खलबतं, कोणाला मिळणार दिल्लीचं तिकीट?


मुंबई : महाराष्ट्रातील एका राज्यसभा जागेने सध्या महायुतीच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या बैठकीत अनेक नावांवर चर्चा होत असून, अखेर दिल्लीच्या राज्यसभेचे तिकीट कोणाच्या गळ्यात पडणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राज्यातील रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे मंत्री छगन भुजबळ. पक्षातील अनेक वरिष्ठ नेते त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सध्या तरी भुजबळ यांचे पारडे जड मानले जात असले तरी अंतिम निर्णय अद्याप गुलदस्त्यात आहे.

दरम्यान, माजी खासदार नवनीत राणा यांचे नावही अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटींमुळे त्यांच्या उमेदवारीच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांना संधी मिळू शकते का, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

मात्र, विचारधारेचा मुद्दा पुढे करत नवनीत राणा यांनी उमेदवारीबाबत फारसा सकारात्मक प्रतिसाद दिलेला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दुसरीकडे ठाकरे गटाशी संबंधित एका माजी खासदारानेही राज्यसभेसाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. मात्र त्यांना अपेक्षित पाठिंबा मिळताना दिसत नाही.

प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या बैठकीला पार्थ पवार, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील उपस्थित आहेत. उद्या सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत आणखी एक निर्णायक बैठक होण्याची शक्यता असून त्यानंतर उमेदवाराचे नाव निश्चित होऊ शकते.

दरम्यान, अमोल मिटकरी यांच्या सोशल मीडिया पोस्टनेही चर्चेला नवे वळण दिले आहे. रिक्त झालेली जागा ही राष्ट्रवादीचीच असल्याचा दावा करत अंतिम निर्णय अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालीच होईल, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे.

राज्यसभेच्या या एका जागेसाठी सुरू असलेली राजकीय रस्सीखेच आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, अखेर दिल्लीचा मार्ग भुजबळांसाठी मोकळा होणार की एखादा नवा चेहरा बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!