‘एकाच पावसाने महाराष्ट्र ठप्प!’ सुप्रिया सुळेंचा सरकारवर घणाघात; तात्काळ आणीबाणी जाहीर करण्याची मागणी

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, जुना मुंबई-पुणे महामार्ग, मिसिंग लिंक प्रकल्पाचा मार्ग तसेच इतर महत्त्वाचे रस्ते बंद पडणे, रेल्वे वाहतुकीवर परिणाम, दरडी कोसळण्याच्या घटना आणि पूरस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राज्यातील परिस्थितीचा सर्वंकष आढावा घ्यावा आणि आवश्यक असल्यास आणीबाणी जाहीर करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रात दरवर्षी पाऊस पडतो, मात्र यंदा वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक सुविधांवर झालेला परिणाम अभूतपूर्व आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या दोन प्रमुख शहरांमधील संपर्क अनेक तास विस्कळीत झाला. आळंदीसह अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून दरडी कोसळणे, रस्ते खचणे आणि रेल्वे सेवा बाधित होण्याच्या घटना नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे सरकारने वस्तुस्थिती जनतेसमोर मांडून तातडीच्या उपाययोजना जाहीर कराव्यात, असे त्यांनी सांगितले.
मिसिंग लिंक प्रकल्पाचा उल्लेख करत त्यांनी या प्रकल्पाच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले. मोठ्या निधीतून उभारलेल्या प्रकल्पांचे सेफ्टी ऑडिट झाले होते का, तसेच नैसर्गिक आपत्तींचा विचार करून नियोजन करण्यात आले होते का, याची माहिती सरकारने जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सध्याच्या परिस्थितीत रुग्ण, विद्यार्थी, नोकरदार आणि अत्यावश्यक सेवांवर मोठा परिणाम होत असल्याचे सांगत सुळे यांनी सरकारने केवळ परिस्थितीचा आढावा न घेता तातडीने प्रभावी निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली. आगामी संसदेच्या अधिवेशनात राज्यातील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
