महाराष्ट्रावर दुहेरी संकट! मुंबईत महाभरती,नाशिकला ढगफुटीचा धोका; मुख्यमंत्र्यांनी दिला हाय अलर्ट


मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी, पूरस्थिती, दरडी कोसळणे आणि जोरदार वाऱ्याचा धोका वाढला असून राज्याची संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मुंबईत अल्पावधीत महिनाभराइतका पाऊस झाला असून दुपारनंतर समुद्रात मोठी भरती आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सखल भागांत पाणी साचणे, झाडे कोसळणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यासाठीही प्रशासनाला विशेष सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही भागांत अतिमुसळधार पावसासह ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, प्रशासनाने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. धोकादायक ठिकाणांवरील नागरिकांचे स्थलांतर, आपत्कालीन पथकांची नियुक्ती आणि बचाव साहित्याची उपलब्धता यावर भर देण्यात आला आहे.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी वारकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केले. इंद्रायणी नदीवरील पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता लक्षात घेता वारकऱ्यांनी देहू आणि आळंदी येथे गर्दी न करता नियोजित वेळेनुसार थेट पुण्यात पोहोचावे, असे त्यांनी सांगितले. पावसाळी पर्यटन, धबधबे, घाटरस्ते आणि दरडप्रवण भाग टाळण्याचे आवाहन करत शासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!