सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! मोबाईल रिचार्ज ‘इतक्या’ टक्क्यांनी महागणार?

मुंबई : मोबाईल वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या काही महिन्यांत मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता असून, दूरसंचार कंपन्या रिचार्ज प्लॅन्सच्या दरात 12 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. 5G नेटवर्कचा विस्तार, वाढती गुंतवणूक आणि महसूल वाढवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला जाऊ शकतो.

देशातील प्रमुख दूरसंचार कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया पुढील तीन ते चार महिन्यांत रिचार्ज दर वाढवू शकतात. यापूर्वी झालेल्या दरवाढीनंतर पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्चच्या आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीसाठी प्रसिद्ध झालेल्या टेलिकॉम आणि इंटरनेट क्षेत्रावरील अहवालात, दूरसंचार बाजारातील स्पर्धा कमी झाल्याने दरवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. बाजारात मोजक्याच कंपन्या उरल्यामुळे पुढील काही महिन्यांत 12 ते 15 टक्के दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अहवालानुसार, 2G वरून 4G आणि 5G सेवांकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. पोस्टपेड ग्राहकांची संख्या वाढणे, डेटा वापरात वाढ आणि 5G नेटवर्कचा वेगाने विस्तार यामुळे दूरसंचार कंपन्यांच्या महसुलात वाढ होण्याची अपेक्षा आहे.

अंदाजानुसार, एका तिमाहीत रिलायन्स जिओ सुमारे 70 लाख, भारती एअरटेल सुमारे 50 लाख, तर व्होडाफोन आयडिया सुमारे 2 लाख नवीन ग्राहक जोडू शकते. तसेच जिओ आणि एअरटेलने देशातील 90 टक्क्यांहून अधिक जिल्ह्यांमध्ये 5G सेवा सुरू केली असून, नेटवर्क विस्तारासह 5G उपकरणे आणि फिक्स्ड ब्रॉडबँड सेवांवरही भर दिला जात आहे.
एकूणच, येत्या काही महिन्यांत मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी आपल्या मासिक खर्चाचे नियोजन करून ठेवणे आवश्यक ठरणार आहे.