पाटस येथील १० एकर गायरान जमीन दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीला मंजूर, आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश

दौंड : दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मौजे पाटस (ता. दौंड, जि. पुणे) येथील गट नं. ८९० मधील १० एकर इतकी शासकीय गायरान जमीन कृषी उत्पन्न बाजार समिती, दौंड यांना ‘बाजार आवार उभारणी’ या सार्वजनिक प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आली आहे. आमदार ॲड. राहुल कुल यांच्या सातत्यपूर्ण आणि यशस्वी पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.

या संदर्भातील अधिकृत शासन ज्ञापन महसूल व वन विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आले आहे. ही जमीन केवळ नाममात्र १ रुपया या दराने कब्जेहक्काने प्रदान करण्यास शासनाने पूर्वमंजुरी दिली आहे. दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून पाटस परिसरातील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी हक्काची जागा आणि अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आमदार ॲड. राहुल कुल गेल्या अनेक दिवसांपासून शासन दरबारी सातत्याने प्रयत्नशील होते. त्यांच्या या मागणीची दखल घेत राज्य शासनाने ही १० एकर जमीन पणन संचालक, पुणे यांच्या नावावर ‘भोगवटादार वर्ग-२’ म्हणून मंजूर केली आहे. या जागेवर पुढील ३ वर्षांच्या आत बाजार आवाराचे काम सुरू होणे बंधनकारक असणार आहे.
हा महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याबद्दल आमदार ॲड. राहुल कुल यांनी समाधान व्यक्त केले असून, दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासाला गती दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जी यांचे विशेष आभार मानले आहेत. या निर्णयामुळे संपूर्ण दौंड तालुक्यातून, विशेषतः शेतकरी आणि व्यापारी वर्गातून आमदार ॲड. राहुल कुल यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक होत असून, राज्य शासनाचे आभार मानले जात आहेत.पाटस आणि परिसरातील शेतकरी बांधवांसाठी हे नवीन बाजार आवार मैलाचा दगड ठरेल.

शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या ठिकाणी शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी आणि व्यापार वाढवण्यासाठी या जागेचा मोठा फायदा होईल. आमच्या मागणीला तातडीने मंजुरी देऊन निधी आणि जमिनीचा प्रश्न सोडवल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनापासून आभारी आहे. – आमदार ॲड. राहुल कुल, दौंड विधानसभा मतदारसंघ