पालखीच्या स्वागताची तयारीच नाही! पुणे–सोलापूर महामार्गाच्या दुरवस्थेवर युवराज काकडे संतप्त; दोन दिवसांचा अल्टिमेटम

लोणी काळभोर : संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना पुणे–सोलापूर महामार्गाची दुरवस्था कायम असल्याने वारकरी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

महामार्गाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे (एमएसआयडीसी) गेल्यानंतरही पालखी मार्गावरील दुरुस्तीची कामे रखडल्याचा आरोप करत हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत कामे पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
युवराज काकडे म्हणाले, पालखी मार्गाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला जातो. मात्र प्रत्यक्षात महामार्गावर मोठमोठे खड्डे, उखडलेल्या साईडपट्ट्या, तुटलेली सुरक्षा जाळी, चिखलाने भरलेले सेवा रस्ते, वाढलेली काटेरी झुडपे आणि साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अधिकारी केवळ पाहणी करून जातात, मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कोणतीही सुधारणा होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

७ जुलै रोजी देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार असून लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत. ग्रामीण भागातील पहिला मुक्काम लोणी काळभोर–कदमवाकवस्ती येथे असणार आहे. मात्र स्वागतासाठी सज्ज असायला हवा असलेला पुणे–सोलापूर महामार्ग आजही खड्डे, चिखल, रस्त्यावर पडलेली खडी, कचऱ्याचे ढिगारे आणि अतिक्रमणांमुळे धोकादायक बनला असल्याचे काकडे यांनी सांगितले.

हडपसर, शेवाळवाडी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, सोरतापवाडी, कुंजीरवाडी आणि उरुळी कांचन परिसरात पावसाचे पाणी साचल्याने दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पादचाऱ्यांना रस्त्याच्या मधोमध चालावे लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला असून वाहतूक कोंडीची समस्याही गंभीर बनली आहे.
प्रशासनाने कागदी बैठका आणि पाहणीपुरते मर्यादित न राहता तातडीने प्रत्यक्ष दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत. अन्यथा लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी लोकप्रतिनिधी, नागरिक आणि वारकऱ्यांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सभापती युवराज काकडे यांनी दिला आहे.