अखेर ९ महिने १४ दिवसांनंतर पृथ्वीवर परतल्या सुनीता विल्यम्स, समुद्रात यशस्वी लँडिंग…

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ९ महिने १३ दिवस अडकून पडलेले ‘नासा’चे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर बुधवारी पहाटे पृथ्वीवर परतले आहेत.
भारतीय वेळेनुसार आज (ता.१९) पहाटे ३.३० वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरले. १७ तासांच्या प्रवासानंतर हे अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत.
हे दोघेही इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानाच्या साहाय्याने पृथ्वीवर परतले आहेत. निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हेदेखील त्यांच्यासोबत होते. हे चौघेही अमेरिकेतील फ्लोरिडाजवळील समुद्रात उतरले. तिथून नासा आणि स्पेसएक्स टीमने त्यांना बाहेर काढले. ९ महिन्यांपेक्षा अधिक काळा अंतराळात घालवून परत आलेल्या या अंतराळवीरांनी ऐतिहासिक अंतराळ मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली.
सुनीता विलियम्स आणि त्यांचे साथीदार १८ मार्च २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरून रवाना झाले होते. स्पेसक्राप्ट अवकाशात गेल्यानंतर तापमान १६५० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त होते. ७ मिनिटांपर्यंत कम्युनिकेशन बॅकआऊट झाले होते.
पॅराशूटद्वारे येणारे ड्रगन कॅप्सूल समुद्रात लँड झाले. त्यामध्ये सुनीता विलियम्स आणि बूच विल्मोरसह सर्व अंतराळवीर सुरक्षित परतले. विलियम्स अन् इतर सहकाऱ्यांचे लँडिंग होत होते, त्यावेळी नासाच्या सर्व शास्त्रज्ञांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. दरम्यान, कॅप्सूल समुद्रात लँड झाल्यानंतर १० मिनिटे त्याचं सिक्युरीटी चेक करण्यात आले.
नासाच्या मोहिमेचा भाग म्हणून सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांनी गेल्या वर्षी ५ जून २०२४ रोजी बोईंग अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उड्डाण केले. त्यांना तिथे फक्त एक आठवडा थांबायचे होते; पण अंतराळयानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते दोघेही पृथ्वीवर परतू शकले नाहीत. त्या दोघांसाठी, १० दिवसांचे मिशन ९ महिन्यांहून अधिक काळाच्या प्रतीक्षेत बदलले.