‘गुरुपौर्णिमेच्या नावाखाली व्यक्तिपूजा?’ विद्यार्थ्यांकडून भाजपाच्या नगरसेविकेचे पाय धुतल्याने पुण्यात खळबळ; शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह

पुणे : पुणे शहरातील सुखसागर नगर परिसरातील महापालिकेच्या एका शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांकडून भाजपच्या महिला नगरसेविका वर्षा भीमराव साठे यांचे पाय धुण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, या घटनेची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून निष्पक्ष चौकशीची मागणीही जोर धरत आहे.
माहितीनुसार, गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेत विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका वर्षा साठे उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान काही विद्यार्थ्यांकडून त्यांच्या पायांचे पूजन करण्यात आले. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर समोर आल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त करत शाळा ही व्यक्तिपूजेची नव्हे तर विद्यार्थ्यांमध्ये विचार, विवेक आणि संविधानिक मूल्ये रुजवण्याची जागा असल्याचे मत मांडले.

या घटनेचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे पुणे शहर उपाध्यक्ष अमोल परदेशी यांनी तीव्र निषेध केला आहे. शाळांमध्ये अशा प्रकारच्या उपक्रमांना स्थान असू नये, असे सांगत त्यांनी शिक्षण संस्था या समता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संविधानिक विचारांची जोपासना करणाऱ्या असाव्यात, अशी भूमिका मांडली.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र मानले. विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक, पेन आणि भारतीय संविधान असायला हवे, कोणत्याही राजकीय व्यक्तीची पूजा नव्हे, असे अमोल परदेशी यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांकडून लोकप्रतिनिधींचे पाय धुण्याचा प्रकार हा संविधानिक मूल्यांशी विसंगत असून शिक्षण व्यवस्थेच्या मूलभूत तत्त्वांनाच धक्का देणारा असल्याची टीकाही त्यांनी केली.
याप्रकरणी संबंधित शाळा प्रशासन, कार्यक्रमाचे आयोजक आणि जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच भविष्यात कोणत्याही शाळेत विद्यार्थ्यांचा अशा प्रकारे वापर होणार नाही, यासाठी शिक्षण विभागाने स्पष्ट नियमावली जाहीर करावी, अशी मागणीही पुढे आली आहे.
या घटनेमुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले असून पालक, शिक्षक आणि सामाजिक संघटनांमध्येही या विषयावर तीव्र चर्चा सुरू झाली आहे. आता महापालिका शिक्षण विभाग आणि प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.