दिशा सालियन प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! CBI च्या FIR मध्ये आदित्य ठाकरेंचं नाव; बॉलिवूड कलाकारांचाही समावेश


मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अखेर एफआयआर दाखल केली आहे. एफआयआरमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील काही बड्या नेत्यांसह पोलिस अधिकारी आणि बॉलिवूडमधील व्यक्तींच्या नावांचा उल्लेख असल्याने राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांच्या तक्रारीच्या आधारे ही एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. त्यांच्या जबाबाचाही उल्लेख सीबीआयच्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

आदित्य ठाकरे, डिनो मोरिया यांच्यासह अनेकांची नावे

सतीश सालियन यांनी दिलेल्या जबाबात शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, रिया चक्रवर्ती यांच्यासह तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह, सचिन वाझे आणि इतर काही पोलिस अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख असल्याची माहिती आहे. या व्यक्तींविरोधात चौकशी आणि कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील पुरावे सरकारी यंत्रणांचा कथित गैरवापर करून नष्ट करण्यात आल्याचा आरोप सतीश सालियन यांनी केला आहे. मात्र, हे आरोप असून त्यांची सत्यता सीबीआयच्या तपासातून स्पष्ट होणार आहे.

एफआयआरमध्ये आदित्य ठाकरे यांच्यासह अभिनेता सूरज पंचोली आणि डिनो मोरिया यांच्या नावांचाही उल्लेख करण्यात आल्याची माहिती आहे.

नेमकं काय आहे दिशा सालियन प्रकरण?

८ जून २०२० रोजी दिशा सालियनचा मुंबईतील मालवणी परिसरातील एका इमारतीतून पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीच्या तपासात या घटनेकडे अपघाताच्या दृष्टीने पाहण्यात आले होते. मात्र, त्यानंतर या मृत्यूबाबत विविध प्रकारचे आरोप आणि संशय व्यक्त करण्यात आले.

या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला.

CBI कडून विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती

आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून करण्यात येणार आहे. या हाय-प्रोफाइल प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआय दिल्ली मुख्यालयातील विशेष पोलीस उपअधीक्षक (DSP) पुराण सिंह यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे.

त्यांच्या नेतृत्वाखालील पथक दिशा सालियनच्या मृत्यूशी संबंधित सर्व बाबींचा तपास करणार आहे. एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलेल्या व्यक्तींच्या भूमिकेसह यापूर्वी झालेल्या तपासातील बाबींचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी?

एफआयआरमध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह, सचिन वाझे, डीसीपी विशाल ठाकूर, मालवणी पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकारी, एसआयटीचे सदस्य तसेच कलिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीशी संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेचा उल्लेख असल्याची माहिती आहे.

सरकारी यंत्रणा, निधी आणि पोलिसांचा कथित गैरवापर करून या प्रकरणातील संबंधित व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या सर्व आरोपांची आता सीबीआयकडून चौकशी केली जाणार असून, तपासातून नेमकी वस्तुस्थिती समोर येणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!