मुंबई आंदोलनाला परवानगी नाही; मनोज जरांगे पाटलांचा नवा प्लॅन, मुंबईला येणार पण….

मुंबई : देवदेवतांच्या आडून आपल्यावर वार करण्याचा प्रयत्न झाला. आपल्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली. मात्र, मी एकटा मुंबईला जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस, मला मुंबईला जाण्याची परवानगी देणार आहात की नाही? उद्या सकाळी मी अंतरवालीहून मुंबईकडे निघेन, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली.
“मराठ्यांची खिंड आता मी एकटा लढणार. मराठ्यांनो, तुम्हाला मी योग्य वेळी मुंबईला बोलावेन,” अशी नवी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली. आपण आंदोलनावर ठाम असल्याचे सांगत मराठा समाजाने आंदोलनावर लक्ष ठेवून राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मुंबई पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार, याकडे राज्याचे आणि विशेषतः मराठा समाजाचे लक्ष लागले होते. अखेर जरांगे पाटील यांनी आंदोलनावर ठाम असल्याचे स्पष्ट केले असून, आपण उद्या अंतरवालीहून मुंबईच्या दिशेने रवाना होणार असल्याचे सांगितले.


“देवदेवतांच्या आडून आपल्यावर डाव टाकायचा सरकारचा प्लॅन दिसतो आहे. मात्र, आपला जो मार्ग ठरला आहे, त्याच मार्गाने मी मुंबईला जाणार आहे. मराठा आंदोलकांनी नाराज होऊ नये. तुम्ही केलेली तयारी वाया जाणार नाही. मी एकटा जातोय म्हणजे मराठ्यांनी मुंबईला येऊ नये, असे नाही,” असे सूचक वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले.
उद्या सकाळी अंतरवालीहून मुंबईकडे रवाना
“उद्या सकाळी मी अंतरवालीहून मुंबईला जायला निघेन. आपला पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे असणार आहे. आपला मुक्काम जिथे असेल, तिथे अंतरवालीप्रमाणे व्यासपीठ बनवा,” अशा सूचना जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
“मी सलाईन आणि पाण्याच्या जीवावर तुमच्याशी बोलतोय. आंदोलन करताना त्रास होतोय, पण समाजासाठी मी आंदोलन करणारच. मी क्षत्रिय मराठा आहे, सरकारसमोर गुडघे टेकणार नाही,” असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.