यवतमध्ये जादूटोण्याच्या संशयातून धक्कादायक प्रकार; महिलेचा विनयभंग, आरोपीविरोधात नरबळी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा


दौंड : दौंड तालुक्यातील यवत गावच्या हद्दीत घरासमोर अघोरी कृत्य आणि जादूटोणा करण्याच्या उद्देशाने साहित्य ठेवून दहशत निर्माण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच, महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवार (दि. ११) रोजी सकाळी ६ वाजता तसेच १२ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घराच्या दरवाजाबाहेर एका बॉक्समध्ये अघोरी साहित्य ठेवलेले आढळून आले. या साहित्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेबाबत तक्रार देण्यासाठी पीडित महिला पोलीस चौकीकडे जात असल्याच्या रागातून आरोपीने त्यांच्या घराच्या दरवाजावर जोरजोरात लाथा मारल्याचा आरोप आहे. त्यानंतर दरवाजा उघडल्यानंतर आरोपीने महिलेला घराबाहेर ओढले. महिलेने प्रतिकार केल्यानंतर आरोपीने तिच्या साडीला ओढून गैरवर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तसेच, “सकाळपासून पोलीस चौकीला तक्रार देण्यासाठी जात आहेस,” असे म्हणत आरोपीने महिलेला शिवीगाळ करून दमदाटी केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यावेळी महिलेचे पती आणि दोन्ही मुले बाहेर आल्याने आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून यवत पोलीस ठाण्यात अरुण रामभाऊ दोरगे (रा. आनंदग्राम सोसायटी, यवत, ता. दौंड, जि. पुणे) याच्याविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ मधील कलम ३(२), तसेच विनयभंग आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!