महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! ठाकरे गटातील 6 खासदारांच्या बंडाची शक्यता; ‘ऑपरेशन टायगर’ला वेग

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार नाराज असल्याची चर्चा रंगली असून, पक्षाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू असून, ठाकरे गटातील काही नवनिर्वाचित खासदार वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत महत्त्वाच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत विचार करत असून, त्यासंदर्भातील हालचाली वेगाने सुरू आहेत. हे खासदार दिल्लीत दाखल झाल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे राजस्थानमध्येही काही महत्त्वाच्या बैठका घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील दिल्लीत पोहोचल्याची माहिती समोर आल्यानंतर या चर्चांना आणखी उधाण आले आहे. तसेच परभणीचे खासदार संजय ‘बंदू’ जाधव यांच्याबाबतही विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

बंडू जाधव हे शिवसेनेचे जुने आणि निष्ठावंत नेते मानले जातात. मात्र, मतदारसंघातील विकासकामे, निधी आणि पक्षातील स्थान याबाबत ते नाराज असल्याच्या चर्चा काही काळापासून सुरू आहेत. अलीकडेच झालेल्या खासदारांच्या बैठकीला त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित न राहता ऑनलाइन सहभाग घेतल्यामुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
मात्र, या सर्व घडामोडींवर संबंधित नेत्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात नेमके काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.