‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’चा राज्यव्यापी शुभारंभ संपन्न, शेतकऱ्यांना मोठी संधी, जाणून घ्या…


मुंबई : आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ या महत्त्वाकांक्षी राज्यव्यापी उपक्रमाचा शुभारंभ संपन्न झाला. पानी फाऊंडेशनने २०२२ पासून महाराष्ट्रातील ४६ तालुक्यांमध्ये यशस्वीपणे राबविलेल्या ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ उपक्रमाचा विस्तार आता राज्यातील सर्व ३५१ तालुक्यांपर्यंत करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, उमेद अभियान आणि पानी फाऊंडेशन यांच्या संयुक्त सहभागातून शेतकऱ्यांमध्ये गटशेतीची चळवळ उभी करण्यासाठी व्यापक स्तरावर कार्यवाही करण्यात आली आहे. याबाबत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली आहे.

या उपक्रमांतर्गत कृषी विभागातील १२,१११ अधिकारी व कर्मचारी तसेच उमेदमधील ३०,३५९ अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर ४५,१९० शेतकरी व कृषीसखी यांच्यापर्यंत फार्मर कपची माहिती पोहोचवण्यात आली. राज्यभरातील ३६ प्रशिक्षण केंद्रांवर ३२,९९३ शेतकरी आणि समूह संसाधन व्यक्तींना तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण देण्यात आले.

गटशेतीच्या माध्यमातून शेतीचा खर्च कमी करणे, उत्पादनक्षमता वाढविणे, कृषी विद्यापीठांच्या शिफारशीनुसार आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करणे आणि शेतकऱ्यांना अधिक सक्षम बनविणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या संकल्पनेला राज्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

“एक पीक एक गट” या संकल्पनेअंतर्गत तब्बल २५,८२३ शेतकरी गट फार्मर कप २०२६ साठी सज्ज झाले आहेत. शेतकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन मिळावे यासाठी कृषी विद्यापीठांतील शास्त्रज्ञांच्या सहभागातून २५ मे २०२६ पासून डिजिटल शेतीशाळाही सुरू करण्यात आल्या आहेत. ज्ञान, तंत्रज्ञान, नियोजन आणि सामूहिक प्रयत्न यांच्या बळावर महाराष्ट्रातील शेतकरी अधिक समृद्ध व्हावेत, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे.

‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ हा केवळ एक उपक्रम नसून, शेतकऱ्यांच्या सामूहिक शक्तीला दिशा देणारी आणि ग्रामीण भागात विकासाची नवी चळवळ निर्माण करणारी संकल्पना आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील शेती अधिक स्पर्धात्मक, आधुनिक आणि समृद्ध करण्याचा निर्धार आपण सर्वांनी केला आहे. बळीराजाच्या प्रगतीसाठी, गटशेतीच्या बळावर समृद्ध महाराष्ट्र घडविण्याचा हा संकल्प आहे. असेही ते म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!