वाघोली ते शिरूर दरम्यान पीएमपीची बससेवा सुरु करा ; जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे यांची मागणी


शिक्रापूर : पीएमपीएमएलचा वाघोली बसडेपो पूर्ण क्षमतेने चालू झाल्याने वाघोली डेपो अंतर्गत वाघोली ते शिरूर शहर बससेवा सुरू करण्याची मागणी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे यांनी केली आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल पाचर्णे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांना निवेदन दिले आहे.

वाघोली पीएमपीएमएलचा बसडेपो पूर्ण क्षमतेने गेल्या महिन्यात चालू झाला आहे. सध्या वाघोली ते रांजणगाव एमआयडीसी मार्गे कारेगाव अशी पीएमपीएमएलची बससेवा सुरू आहे. पूर्वी सदर मार्गावर पुणे स्टेशन ते कारेगाव अशी बससेवा सुरू होती. सदर मार्गावर कामगार, विद्यार्थी, नागरिक मोठ्या प्रमाणावर पुणे, वाघोली, रांजणगाव एमआयडीसी, शिक्रापूर, कोरेगाव, पुणे या ठिकाणी येतात असल्याने सदर बस सेवेला चांगला प्रतिसाद आहे.

शिरूर शहर तसेच रामलिंग रोड व बाबुरावनगर परिसरात नागरिकरण झपाट्याने वाढत आहे. शिरूर शहर हे तीन तालुक्याची बाजारपेठ आहे.रामलिंग रोड व बाबुरावनगर परिसर पीएमआरडीएच्या हद्दीत येत असून या परिसरातून रांजणगाव एमआयडीसी, शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, वाघोली, पुणे येथे जाणाऱ्या नागरिक, विद्यार्थी, कामगार वर्ग यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पीएमपीएमएलचा वाघोली डेपो पूर्ण क्षमतेने चालू झाल्याने पीएमपीएमएलची सेवा वाघोली कारेगाव न ठेवता ती पुढे वाघोली ते शिरूर असे केल्यास सदर बस सेवेला निश्चितच नागरिक, विद्यार्थी व कामगार वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळेल.

शिरूर शहर व रामलिंग रोड बाबुराव नगर परिसरातील नागरिक, विद्यार्थी कामगार वर्ग यांच्या सोयीच्या दृष्टीने वाघोली ते शिरूर शहर अशी वाघोली डेपो अंतर्गत पीएमपीएमएलची बससेवा सुरू करण्याची मागणी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!