एसटी तिकीट दर वाढीमुळे झालं अवघड! आता एसटीपेक्षा खाजगी वाहन परवडतय, प्रवाशांचा संताप…

मुंबई : दोन दिवसांपूर्वी परिवहन महामंडळाने एसटी बसच्या तिकीट दरात १४.९७ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. यामुळे सर्वसामान्य लोकांना आता एसटीचा प्रवास महागणार आहे. यामुळे नाराजीचा सूर पुढे येत आहे. यामुळे आता एसटीने प्रवास करायचा असेल तर जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.
राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक पार पडली. त्या बैठकीत एसटीसह रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला. यामुळे खिशाला झळ बसणार आहे. एसटीची भाडेवाढ गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. अखेर याबाबत आता निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, यामध्ये प्रतिटप्पा १० ते १४ रूपये भाडेवाढ एसटीने केली आहे. आता साधी व जलद, तसेच रातराणी बस सेवेला एका टप्प्याला १०.५ रूपये, वातानुकूलित शयन आसनी बसला १३.६५, तर शिवशाही बसला १४.२० रूपये प्रतीटप्पा दर वाढला आहे
यामुळे आता खाजगी वाहन परवडेल असा सूर प्रवाशांमधून पुढे येत आहे. याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हंटले आहे की एसटीची भाडेवाढ दरवर्षी करणं गरजेचं आहे. प्रवाशांना सुखसोयी देत असताना डीझेल-सीएनजीचा दर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे.
तसेच कर्मचाऱ्यांचे पगार वाढले आहेत. एसटी महामंडळाची परिस्थितीत बघितली तर दरदिवशी सुमारे ३ तर दर महिन्याला ९० कोटी रुपयांचा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे भाडेवाढीशिवाय पर्याय नाही, त्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे, असं परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
आमच्या सरकारने ज्या जुन्या सवलती आणि योजना सुरु केल्या आहेत, त्यामध्ये कुठेही कटोती होणार नाही. सर्वसामान्य आमच्या लाडक्या बहिणींना देण्यात आलेली ५० टक्के सूट ही कायम राहिल. या सवलतीमुळेच एसटीचं उत्पन्न वाढलं आहे. त्यामुळे कोणत्याही योजनेत कटोती होणार नाही, असं परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.