Sovereign Gold Bond Scheme : ग्राहकांनो ही संधी पुन्हा नाही! सर्वांसाठी स्वस्तात सोने खरेदीची मोठी संधी, जाणून घ्या काय आहे दर?

Sovereign Gold Bond Scheme नवी दिल्ली : ऐन सणउत्सवात सोन्यात ( Sovereign Gold Bond Scheme) गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी पुन्हा एकदा चालून आली आहे. आता केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा स्वस्त सोने विकले जाणार असून, तुम्ही बाजारापेक्षा कमी दराने सोने खरेदी करू शकता. (Sovereign Gold Bond Scheme)

केंद्र सरकारने सार्वभौम सुवर्णरोखे योजनेच्या २०२३ च्या सप्टेंबर सीरिजसाठी सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ५,९२३ रुपये निश्चित केली आहे. ही सीरिज गुंतवणुकीसाठी आज खुली होत असून ती १५ सप्टेंबर रोजी बंद होईल. ही केंद्र सरकारची योजना असून ती सोन्यात इलेक्ट्रॉनिक स्वरुपात गुंतवणूक करण्याची सुविधा देते.
हे रोखे सोन्याच्या ग्रॅममध्ये दिले जातात आणि एक ग्रॅमच्या पटीत जारी केले जातात. सार्वभौम सुवर्णरोखे योजनेत किमान एक ग्रॅम गुंतवणूक करता येते. तर प्रति आर्थिक वर्ष (एप्रिल ते मार्च) कमाल मर्यादा ५०० ग्रॅम प्रति व्यक्ती इतकी आहे. ट्रस्ट आणि इतर संस्थांसाठी एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त २० किलोग्रॅम सोन्यात गुंतवणूक करु शकतात.

सार्वभौम सुवर्ण रोखे नवीन मालिका
आरबीआय चालू आर्थिक वर्षासाठी सार्वभौम गोल्ड बाँड योजनेची दुसरी मालिका ११ सप्टेंबर रोजी जारी करेल आणि इच्छूक ग्राहक ११ ते १५ सप्टेंबर या कालावधीत सार्वभौम गोल्ड बाँड खरेदी करू शकतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी सांगितले की सार्वभौम गोल्ड बाँडच्या पुढील हप्त्यासाठी प्रति ग्रॅम ५,९२३ रुपये इश्यू किंमत निश्चित करण्यात आली आहे.
तसेच सार्वभौम सुवर्णरोखे योजनेचा कालावधी आठ वर्षांचा आहे. या गोल्ड बाँड योजनेत गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांना वार्षिक २.५ टक्के फिक्स्ड रेटनुसार व्याज मिळते. हे व्याज वर्षातून दोनदा जून आणि डिसेंबरमध्ये दिले जाते.
गोल्ड बाँडवरील व्याज प्राप्तिकर कायदा, १९६१ (१९६१ चा ४३) च्या तरतुदीनुसार करपात्र राहते. जर तुम्हाला या आधीच पैसे काढायचे असतील तर ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर काढू शकता.
दरम्यान, सार्वभौम सुवर्णरोखे योजनेतंर्गत सोने विक्री शेड्यूल्ड कमर्शियल बँका (छोट्या वित्त बँका, पेमेंट बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका वगळता), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड द्वारे केली जाते.