सोलापुरात खळबळ; कर सेवेतील 2 अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

सोलापूर : एका खाजगी फर्मला जीएसटी क्रमांक देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टीमने कारवाई केली आहे. यामुळे आता यामुळे वस्तू व सेवा कार्यालयातील अब्रू टांगणीला लागली आहे.राज्य कर अधिकारी महेश जरीचंद चौधरी व आमसिध्द इराण्णा बगले अशी अधिकाऱ्यांची नावे आहेत.विजापूर नाका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद झाला आहे. लाखभर पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर पाच हजार रुपयांची लाच घेताना कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर मधील एका तक्रारदाराने अँटी करप्शन सोलापूर युनिट यांच्याकडे तक्रार केली होती. प्राप्त तक्रारीनुसार सापळा लावण्यात आला होता. तक्रारदार यांच्या मालकीचे कंन्स्ट्रक्शन अॅन्ड सर्विंग फर्म आहे. तक्रारदार याने फर्मच्या नावे वस्तु व सेवाकर कार्यालय येथे नवीन जीएसटी क्रमांक मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. वस्तू व सेवा कर कार्यालयातील राज्य कर अधिकारी महेश जरीचंद चौधरी, राज्य कर निरीक्षक आमसिध्द इराण्णा बगले यांनी तक्रारदार यांना नवीन जी.एस.टी क्रमांकास मंजूरी देणेकरीता तक्रारदार यांच्याकडे ५,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती. एसीबी अधिकाऱ्यांनी जीएसटी कार्यालयातील अधिकारी लाच मागत असल्याची पडताळणी केली. त्यानंतर लाच स्वीकारताना दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
. ही कारवाई एसीबीचे उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेश पवार(पोलीस निरीक्षक, एसीबी), गणेश पिंगुवाले( पोलीस निरीक्षक, एसीबी, सोलापूर),पोह/ अतुल घाडगे, पोह सलीम मुल्ला, पोना स्वामीराव जाधव, पोह राहुल गायकवाड, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
