नीट प्रकरणात धक्कादायक वळण! ‘पूर्ण पेपर फुटलाच नव्हता’; मग परीक्षा रद्द का झाली? पहिल्यांदाच मोठा खुलासा


नवी दिल्ली : देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेल्या नीट परीक्षेबाबत आता मोठा खुलासा समोर आला आहे. आतापर्यंत “पूर्ण पेपर फुटला” म्हणून गाजत असलेल्या या प्रकरणात आता वेगळंच सत्य पुढे आलं आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे प्रमुख अभिषेक सिंह यांनी संसदीय समितीसमोर केलेल्या विधानामुळे संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.

वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट परीक्षा यंदा गैरप्रकारांच्या आरोपांमुळे वादाच्या भोऱ्यात सापडली होती. पेपरफुटी, कॉपी प्रकरणं आणि दलालांच्या जाळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने परीक्षा रद्द करत तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवला होता. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, संपूर्ण प्रश्नपत्रिका लीक झाली नव्हती, तर फक्त काही प्रश्न बाहेर गेले होते.

संसदेच्या स्थायी समितीसमोर बोलताना अभिषेक सिंह यांनी स्पष्ट केलं की, “परीक्षेदरम्यान काही गंभीर अनियमितता आणि गैरप्रकार उघड झाले. काही प्रश्न बाहेर गेल्याचं निदर्शनास आलं. जरी संपूर्ण पेपर लीक झाला नसला, तरी एवढंही पुरेसं गंभीर आहे की त्यामुळे संपूर्ण परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं.”

या बैठकीत उच्च शिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी यांनीही तपास योग्य दिशेने सुरू असल्याचं सांगितलं. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल आणि अतिरिक्त सुरक्षा उपाय लागू करण्यावर भर दिला जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणेकडून देशभरात मोठी कारवाई सुरू आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील आरोपींना अटक करण्यात आली आहे. काही शैक्षणिक संस्थांशी संबंधित अधिकाऱ्यांचाही या प्रकरणात समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

नीट परीक्षेच्या गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. आता २१ जून रोजी पुन्हा परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांसमोर नव्याने तयारीचं आव्हान उभं राहिलं आहे. मात्र “पूर्ण पेपर फुटला नव्हता” या खुलाशानंतर देशभरात या निर्णयावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!