राज्यात थरारक ‘चाकू’कांड! टीसी घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याने शिक्षकावर केला हल्ला; अकोल्यात नगरसेविकेच्या पतीवरही जीवघेणे वार

छत्रपती संभाजीनगर : राज्यात मंगळवारी काही तासांच्या अंतराने घडलेल्या दोन धक्कादायक हल्ल्यांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रान्सफर सर्टिफिकेट (टीसी) घेण्यासाठी शाळेत आलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याने शिक्षकावर चाकूने हल्ला केला, तर अकोल्यात काँग्रेसच्या नगरसेविकेच्या पतीवर भररस्त्यात जीवघेणे वार करण्यात आले. दोन्ही घटनांनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून आरोपींविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरातील एका शाळेत ही घटना घडली. संबंधित विद्यार्थी टीसी घेण्यासाठी शाळेत आला होता. त्यावेळी त्याची वर्गशिक्षक विशाल धूशिंग यांच्यासोबत काही कारणावरून वादावादी झाली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शाळेत शिकत असतानाही या विद्यार्थ्याचे शिक्षकांसोबत अनेकदा वाद झाले होते. जुन्या वादातून निर्माण झालेला राग पुन्हा उफाळून आल्याने विद्यार्थ्याने सोबत आणलेल्या चाकूने शिक्षकांवर हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
हल्ल्यानंतर शाळेत एकच गोंधळ उडाला. इतर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने जखमी शिक्षकांना मदत करत शासकीय रुग्णालयात दाखल केले. विशाल धूशिंग यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. चौकशीत हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला चाकू ऑनलाइन मागवण्यात आल्याची बाब समोर आली असून या पार्श्वभूमीवर ऑनलाइन धारदार शस्त्रांच्या विक्रीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, अकोला शहरात घडलेल्या दुसऱ्या घटनेनेही खळबळ उडाली. रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मधील काँग्रेस नगरसेविका रफिया बी यांच्या पती याकुब खान उर्फ याकुब पैलवान यांच्यावर अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या याकुब खान यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. हल्ल्यानंतर आरोपी पसार होण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वैयक्तिक वाद, जुने वैमनस्य किंवा इतर कोणता हेतू होता का, याचा तपास सुरू आहे.
एका बाजूला शाळेत विद्यार्थ्याकडून शिक्षकावर हल्ला, तर दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधीच्या कुटुंबीयावर जीवघेणा वार अशा दोन गंभीर घटनांमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून संबंधितांकडून अधिक माहिती गोळा केली जात आहे.