अजितदादांनी मुख्यमंत्रीपदासाठी महायुती सोडण्याचा निर्णय घेतला होता? बारामती हॉस्टेलमधील त्या भेटीत नेमकं काय घडलं? २०२८ च्या प्लॅनचा गौप्यस्फोट!


मुंबई : अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत आता एक असा दावा समोर आला आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटलं आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच अजितदादा महायुतीतून बाहेर पडण्याच्या तयारीत होते आणि त्यांची मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा होती, असा दावा काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांनी १९ जानेवारी २०२६ रोजी पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये झालेल्या एका भेटीचा उल्लेख करत या चर्चेला नवं वळण दिलं आहे.

विलीनीकरणाच्या चर्चेला सुरुवात होण्यामागेही काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत. शरद पवार रुग्णालयात असताना अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले. त्यातच सुनील तटकरे यांनी अजित पवार यांच्याबाबत मोठा दावा केला. अजितदादा हयात असते, तर १२ फेब्रुवारी रोजीच दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले असते, अशी कल्पना त्यांनी आपल्याला दिली होती, असे तटकरे म्हणाले होते. मात्र, सध्या विलीनीकरणाची चर्चा सुरू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी अजित पवार महायुतीतून बाहेर पडून मुख्यमंत्री होण्याच्या विचारात होते, असा दावा केला. त्यावर प्रतिक्रिया देताना विकास लवांडे यांनी या दाव्याला दुजोरा दिल्याचे सांगितले. १९ जानेवारी २०२६ रोजी आपण आमदार रोहित पवार यांच्यासोबत पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे अजित पवार यांची भेट घेतली होती, असे लवांडे यांनी सांगितले. या भेटीत झालेल्या चर्चेत अजितदादांनी भाजपसोबत फार काळ राजकीय समीकरण टिकणार नसल्याचे स्पष्ट केले होते, असा त्यांचा दावा आहे.

लवांडे यांनी केलेल्या दाव्यानुसार, भाजपच्या कारभाराबाबत अजित पवार नाराज होते. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचे त्यांचे मत होते. त्यामुळे २०२८ मध्ये महायुतीतून बाहेर पडण्याचा विचार असल्याचे अजितदादांनी सांगितले होते, असे लवांडे म्हणाले. एवढेच नव्हे, तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही, असेही अजित पवार यांनी म्हटल्याचा दावा त्यांनी केला.

त्यामुळे आता राजकीय वर्तुळात काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. अजित पवार यांनी खरोखरच महायुतीतून बाहेर पडण्याची रणनीती आखली होती का? मुख्यमंत्रीपदासाठी वेगळे राजकीय समीकरण जुळवण्याचा त्यांचा विचार होता का? आणि दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याबाबत पडद्यामागे चर्चा सुरू होती का? सुनील तटकरे, अतुल लोंढे आणि विकास लवांडे यांच्या वक्तव्यांमुळे या प्रश्नांना पुन्हा हवा मिळाली आहे. मात्र, बारामती हॉस्टेलमधील चर्चेबाबत लवांडे यांनी केलेला दावा आणि अजित पवार यांच्या कथित राजकीय योजनेला अद्याप स्वतंत्र अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!