पुण्यात अपघाताचा थरार ; भरधाव कारची मेट्रो पिलरला जोरदार धडक, गाडीचा चक्काचूर


पुणे : गेल्या काही दिवसांपासून मेट्रो स्थानकावर अपघाताचे प्रमाण वाढले असतानाच आता पौड रस्त्यावरील मेट्रो स्टेशन जवळ भीषण अपघात घडला आहे. एक भरधाव कार मेट्रोस्थानकाच्या पिलरला धडकल्यामुळे कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. सुदैवाने गाडीमधील एअर बॅग मुळे चालक बचावला. काही तरुण कार्यकर्त्यांनी बचाव कार्य या जखमीला तातडीने बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला आहे

या घटनेबाबत सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश बालगुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालगुडे आणि त्यांचे काही मित्र कारमधून स्वारगेटच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांच्या डाव्या बाजूने एक होंडा सिटी कार प्रचंड वेगात पुढे गेली आणि पौड रस्त्यावरील मेट्रोच्या दुहेरी उड्डाणपुलाच्या पिलरला जाऊन जोरात धडकली. अवघ्या काही क्षणात हा अपघात घडला.बालगुडे आणि त्यांच्या मित्रांनी तातडीने त्यांची कार बाजूला लावली आणि बचाव कार्य सुरू केले. जखमीला तात्काळ बाहेर काढले. त्यांचे विचारपूस करून त्यांच्या मोबाईलमधून कुटुंबीयांना फोन लावला. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्ष आणि वाहतूक पोलिसांना देखील या संदर्भात फोन करून माहिती दिली. जखमी व्यक्ती अलंकार पोलीस स्थानकाजवळील परिसरात राहण्यास असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कारचालकाने मद्यपान केलेले असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आलेला आहे. दरम्यान, त्या ठिकाणी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. लोकांनी मदत करण्याऐवजी मोबाईलमध्ये शूटिंग करण्यास सुरुवात केली. या प्रकरणातील जखमीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!