Shirur : कोरेगाव भीमा सावकारी प्रकरणात फिर्यादीचा यू टर्न, नऊ जणांविरोधात गैरसमजातून फिर्याद दिल्याचे प्रतिज्ञापत्र सादर…
Shirur : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील किरण कुलकर्णी आत्महत्या प्रकरणातील फिर्यादी महेश कुलकर्णी यांनी आत्महत्येस जबाबदार ११ पैकी नऊ सावकारांविरोधात दाखल फिर्याद गैरसमजातून दिल्याचे प्रतिज्ञापत्र शिक्रापूर पोलिसांकडे सादर केले.
या प्रकरणातील सर्व बेकायदा सावकार दहा दिवसांपासून फरारी असताना कुलकर्णी यांच्या प्रतिज्ञापत्राने प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. मात्र, या सावकारांविरोधात सबळ पुरावे आमच्याकडे असल्याचा दावा शिक्रापूर पोलिसांनी पुन्हा केला आहे.
कोरोना काळात किराणा व्यवसाय अडचणीत आल्याने दिवंगत किरण कुलकर्णी यांनी काही खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले व ते वेळेत परत करता न आल्याने या सर्व ११ सावकारांच्या जाचाला कंटाळून त्यांनी १० तारखेला या सर्वांची नावे व त्यांनी लावलेल्या कर्जव्याजाची टक्केवारी लिहून आत्महत्या केली होती. Shirur
मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतील नवनाथ भंडारे, संतोष भंडारे, संदीप अरगडे (तिघेही रा. वढू बुद्रुक, ता. शिरूर), सुधाकर ढेरंगे, कांतिलाल रामचंद्र ढेरंगे, अमोल गव्हाणे (तिघेही रा. कोरेगाव भीमा, ता शिरूर), शांताराम सावंत (रा. वाडागाव, ता. शिरूर), अजय यादव, जनार्दन वाळुंज (रा. लोणीकंद, ता. हवेली), किशोर खळदकर (रा. जातेगाव बुद्रुक, ता. शिरूर), मामा सातव (रा. वाघोली, ता. हवेली) यांच्यावर शिक्रापूर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे व बेकायदा सावकारकीचे गुन्हे दाखल केले.
किरण यांचे धाकटे बंधू महेश कुलकर्णी यांनी शिक्रापूर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती. त्यावरूनच त्यांनी आता ११ पैकी नऊ जणांविरोधातील फिर्याद गैरसमजातून दाखल केल्याचे प्रतिज्ञापत्र पोलिसांकडे सादर केले. त्यापूर्वी एक दिवस त्यांनी त्यांचा संपूर्ण किराणा व्यवसायच बंद करण्याचा निर्णय घेत असल्याचेही जाहीर केले होते. आता त्यांच्या या नव्या भूमिकेने खळबळ उडाली आहे.