शिर्डी हादरली! साई मंदिर परिसरात काकडी विक्रेत्या महिलेवर ४-५ महिलांचा जीवघेणा चाकू हल्ला; भरदिवसा सपासप वार

शिर्डी : साईबाबांची पावन नगरी म्हणून ओळख असलेल्या शिर्डीत भरदिवसा घडलेल्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. साई मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक ४ समोर एका महिलेवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे मंदिर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

या हल्ल्यात जयश्री साईनाथ क्षीरसागर (वय ३०) या काकडी व कैरी विक्री करणाऱ्या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, जयश्री क्षीरसागर या अनेक दिवसांपासून मंदिर परिसरात व्यवसाय करत आहेत. शनिवारी स्टिकर विक्री करणाऱ्या ४ ते ५ महिलांनी अचानक त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून संबंधित महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, जखमी जयश्री यांच्या पतीने माध्यमांशी बोलताना तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “माझी पत्नी अनेक वर्षांपासून येथे व्यवसाय करत आहे. तिचे कोणाशीही वैर नव्हते. अचानक काही महिलांनी तिच्यावर चाकूने हल्ला केल्याची माहिती मिळाली. तिची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. साई मंदिर परिसरात महिलाच उघडपणे धारदार शस्त्रे घेऊन फिरत असतील, तर शिर्डीतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.”
या घटनेनंतर साई मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा चर्चेत आली असून, साईभक्त आणि स्थानिक व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ल्यामागील नेमके कारण काय, याचा तपास शिर्डी पोलीस करत आहेत.