Sharad Pawar : अजितदादांना पुन्हा पक्षात घेणार का? शरद पवार यांचे उत्तर ऐकून राजकीय चर्चांना उधाण, नेमकं काय म्हणाले शरद पवार?

Sharad Pawar : वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आणि अजित पवारांसह पक्षातील अनेक महत्वाचे नेते महायुतीत गेले. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला.
ही भूमिका फक्त राजकीय असती तर ठीक होतं, पण ते तेवढ्यापुरतचं राहिलं नाही, आणि सुरू झाले वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप. अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे असे राष्ट्रवादीतले अनेक ज्येष्ठ नेतेही बाहेर पडले.
त्याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांच्याबद्दलही चर्चा सुरू झाली असून ते परत आले तर त्यांना जागा देणार का असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. Sharad Pawar
अजित पवार परत आले तर त्यांना जागा देणार का ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांना विचारण्यात आला असता त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. ‘ घरात सर्वांनाच जागा आहे. पक्षात मी व्यक्तिगत निर्णय घेणार नाही. संघर्षाच्या काळात मजबुतीने उभे राहिले त्यांना आधी विचारणार.’ असे म्हणत शरद पवार यांनी हा विषय संपवला.
त्यामुळे भविष्यात अजित पवारांची कधी घरवापसी झाली तरी त्यांना पक्षात पुनर्प्रवेश आणि तेच स्थान मिळेल की नाही, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. अजित पवार हे कुटुंबाचा भाग असले तरी पक्षाच्या कठीण काळात साथ दिली त्यांच्याशी चर्चा करूनच पक्षाबद्दल निर्णय घेतला जाईल, असे पवारांनी या उत्तरातून स्पष्ट केले आहे.