शरद पवार थेट जंतर-मंतरवर! अभिजित दिपकेंसोबत चर्चा; आंदोलनाला मिळालं नवं बळ

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला राजकीय पाठिंबा वाढताना दिसत आहे. सोमवारी झालेल्या लाठीचार्जनंतर निर्माण झालेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देत अभिजित दिपके यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आणि पुढील भूमिकेबाबत दोघांमध्ये चर्चा झाली.
भेटीदरम्यान अभिजित दिपके यांनी आंदोलनाच्या प्रमुख मागण्या शरद पवार यांच्यासमोर मांडल्या. सोनम वांगचुक यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना ताब्यात ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच दिल्ली आणि मुंबईतील आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत द्यावी आणि आंदोलकांवरील सर्व एफआयआर मागे घ्यावेत, अशा चार प्रमुख मागण्या त्यांनी मांडल्या.

यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत कोणतेही अधिकृत आवाहन नसतानाही आंदोलन झाल्याचा उल्लेख केला. आंदोलनकर्त्यांना आणखी कोणत्या प्रकारच्या मदतीची गरज आहे आणि आंदोलन किती दिवस सुरू ठेवण्याचा विचार आहे, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर अभिजित दिपके यांनी मागील 31 दिवसांपासून जंतर-मंतरवर आंदोलन सुरू असल्याचे सांगितले. सोमवारी झालेल्या लाठीचार्जनंतर सरकारविरोधातील नाराजी वाढल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, या आंदोलनाला विविध विरोधी पक्षांकडूनही पाठिंबा मिळत आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शविला असून, काही काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी संजय राऊत यांनीही जंतर-मंतरवर जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली होती. आता शरद पवार यांच्या भेटीनंतर आंदोलनाला विरोधी पक्षांचा पाठिंबा आणखी मजबूत होत असल्याचे चित्र दिसत आहे.


