Sharad Pawar Group : सुप्रीम कोर्टाचा शरद पवार गटाला मोठा दिलासा, पक्षचिन्ह आणि नावाबाबत निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश…

Sharad Pawar Group : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचा दर्जा अजित पवार गटाला दिल्यानंतर पक्षनाव आणि पक्षचिन्हही त्यांच्याकडे गेले. परिणामी केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं पक्षनाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह दिले.
परंतु, मूळ पक्षनाव आणि पक्षचिन्ह अजित पवार गटाकडे गेल्याने या विरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायलयात आज या प्रकरणी सुनावणी झाली असून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
शरद पवार गटाला तुतारी चिन्ह लोकसभा निवडणुकीपर्यंत वापरता येणार आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नावही वापरण्याची मुभा दिली आहे. विशेष म्हणजे शरद पवार गटाला तुतारी चिन्ह आता राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीतही वापरता येणार आहे.
याबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह राखीव ठेवावे आणि इतर कोणत्याही पक्षाला , उमेदवाराला देऊ नये, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. Sharad Pawar Group
दरम्यान, सुप्रीम कोर्टात गेल्या सुनावणीत अजित पवार गटाची कान उघाडणी झाली होती. शरद पवार यांचा फोटो आणि नाव वापरु नये, असा आदेश देशात सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला दिला होता. त्यानंतर आज पुन्हा राष्ट्रवादीच्या वादावर सुनावणी पार पडली.
या सुनावणीत शरद पवार यांच्या गटाला दिलासा देण्यात आला. शरद पवार यांच्या गटाला येत्या लोकसभा आणि विधानसभा निडणुकीत तुतारी चिन्ह वापरण्याची मुभा सुप्रीम कोर्टाने दिली आहे. तसेच शरद पवार गटाला आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नावही वापरता येणार आहे. यामुळे शरद पवार गटाला दिलासा मिळाला आहे.