पीएम किसानच्या २३ व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार? शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आली समोर…

मुंबई : देशभरातील लाखो शेतकरी पीएम-किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. केंद्र सरकारकडून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपयांचा पुढील हप्ता जमा केला जाणार असून, जून किंवा जुलै २०२६ पर्यंत ही रक्कम खात्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

यापूर्वी १३ मार्च २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील गुवाहाटी येथून पीएम-किसान योजनेचा २२ वा हप्ता वितरित केला होता. आता पुढील हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
पीएम-किसान योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना असून, देशातील लहान आणि गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ती सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६,००० रुपयांची मदत दिली जाते. ही रक्कम २,००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते. बियाणे, खते आणि शेतीसाठी लागणारा इतर खर्च भागवण्यासाठी ही मदत शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही, त्यांच्या खात्यात पुढील हप्ता जमा होण्यास अडचणी येऊ शकतात. शेतकरी ओटीपीच्या माध्यमातून ऑनलाइन ई-केवायसी पूर्ण करू शकतात, तर बायोमेट्रिक ई-केवायसीसाठी जवळच्या CSC केंद्राला भेट द्यावी लागेल. तसेच आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असणेही आवश्यक आहे.

अनेक वेळा आधार, बँक खाते किंवा इतर माहितीत चुका असल्याने हप्ता अडकू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली माहिती वेळेवर अपडेट ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी पीएम-किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘Beneficiary Status’ या पर्यायाद्वारे आपल्या हप्त्याची स्थिती घरबसल्या तपासू शकतात.