शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर..

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही गंभीर बाब नसून ते नियमित वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात गेले असल्याची माहिती समोर आली आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात येत आहेत. वाढते वय आणि सततचा राजकीय दौरा लक्षात घेता त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तपासण्या पूर्ण झाल्यानंतर शरद पवार यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि चाहत्यांनी चिंता करण्याचे कारण नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

याआधी एप्रिल महिन्यातही प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिल्याने त्यांना उपचाराखाली ठेवण्यात आले होते. दरम्यान, यावेळीही नियमित तपासणीसाठीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
