‘टाटा बाय-बाय’ म्हणत भाजपला रामराम! दोन वेळा खासदार राहिलेल्या धर्मेंद्र कश्यपांनी अचानक राजीनामा का दिला? राज्यसभेच्या उमेदवारीनंतर नेमकं काय घडलं?

मेरठ : उत्तर प्रदेशातील राजकारणात भाजपला धक्का देणारी घडामोड समोर आली आहे. बरेली जिल्ह्यातील आवला लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिलेले धर्मेंद्र कश्यप यांनी भाजपच्या प्राथमिक आणि सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, समाजमाध्यमांवर ‘टाटा बाय-बाय’ अशी पोस्ट लिहून त्यांनी आपल्या निर्णयाची माहिती दिली. राज्यसभेच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतरच त्यांनी हे पाऊल उचलल्याने त्यांच्या नाराजीमागचं नेमकं कारण काय, याची चर्चा सुरू झाली आहे.
कार्यकर्त्यांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित

धर्मेंद्र कश्यप यांनी राजीनामापत्रातून पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. पक्षासाठी मेहनत घेणाऱ्या मागास आणि अतिमागास समाजातील कार्यकर्त्यांचा अनादर होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधात काम करणाऱ्यांना बक्षीस दिले जात असल्याची खंतही व्यक्त केली. पक्षातील कार्यकर्त्यांना योग्य सन्मान आणि प्रतिनिधित्व मिळत नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.


राज्यसभेच्या उमेदवारीनंतर नाराजी वाढली?
भाजपने राज्यसभेच्या उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर कश्यप यांनी राजीनामा दिला. भाजपकडून श्रुती गंगवार यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर कश्यप नाराज झाल्याची चर्चा आहे. ते स्वतः राज्यसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते, असे सांगितले जात आहे. मात्र, राजीनाम्यामागे उमेदवारी न मिळणे हेच निश्चित कारण असल्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
वरिष्ठ नेत्यांना राजीनामा पाठवला
कश्यप यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, ब्रिज प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांना उद्देशून राजीनामापत्र पाठवल्याची माहिती आहे. पत्रात त्यांनी कोणत्याही नेत्याचे नाव थेट घेतले नसले, तरी पक्षाच्या निर्णयप्रक्रियेबाबतची नाराजी व्यक्त केली आहे.
भाजप मनधरणी करणार की कश्यपांचा निर्णय कायम राहणार?
धर्मेंद्र कश्यप यांचा राजीनामा पक्षाने स्वीकारला आहे की त्यांची नाराजी दूर करण्यासाठी वरिष्ठ नेते पुढाकार घेणार, याबाबत भाजपकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात राजकीय हालचाली सुरू असतानाच दोन वेळा खासदार राहिलेल्या नेत्याने पक्ष सोडल्याने या घडामोडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. आता भाजपचे वरिष्ठ नेते यावर काय भूमिका घेतात आणि कश्यप पुढे कोणता निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
