शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला हृदयविकाराचा झटका, कोण आहेत गुलाबराव गावंडे?

पुणे :ऐन महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,माजी आमदार गुलाबराव गावंडे यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना तातडीने अकोला येथील एका खासगी रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले आहे.

कोण आहेत गुलाबराव गावंडे?
राज्याचे माजी क्रीडा राज्यमंत्री तथा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ते ज्येष्ठ नेते आहेत. विदर्भातील वजनदार नेता म्हणून गुलाबराव गावंडे यांची ओळख आहे. ते अकोला येथील कौलखेड भागातील रहिवासी आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील माजी आमदार आहेत. सुरवातीच्या काळात ते शिवसैनिक होते. शिवसेना-युतीच्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना गावडे हे विविध चार खात्याचे राज्यमंत्री होते.

गेल्या काही दिवसापासून गुलाबराव गावंडे यांना अस्वस्थ वाटत असल्याने तातडीने अकोला येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्लानुसार त्यांना नागपूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले. येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांचे सुपुत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी दिली आहे.

दरम्यान याआधी अकोला पश्चिम मतदारसंघातून 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर गुलाबरावांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’करुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विदर्भातील आक्रमक नेता अशी ओळख असलेले गुलाबराव हे तीन वेळा वेगवेगळ्या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.