त्या’ मुर्खाला यूपीत पाठवा, आम्ही बंदोबस्त करतो; योगी आदित्यनाथांचा अबू आझमींवर हल्लाबोल…

मुंबई : समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू आझमी यांना औरंगजेबचे गुणगान करणे चांगलेच महागात पडले. त्यांच्या त्या वक्तव्यांच्या विरोधात महाराष्ट्रात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर राज्याच्या विधानसभेत त्याचे पडसाद उमटले. भाजप-शिवसेनेने अबू आझमींना घेरले. तसेच त्यांचा निलंबनाचा प्रस्ताव मांडला.
त्यानंतर संपूर्ण अधिवेशन काळापर्यंत अबू आझमी यांना निलंबित करण्यात आले. दुसरीकडे अबु आझमी यांच्या वक्तव्याचे पडसाद उत्तर प्रदेश विधान परिषदेतही उमटले. याठिकाणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आझमींच्या विधानावर संतप्त भूमिका घेत समाजवादी पक्षावर निशाणा साधला.
बुधवारी विधान परिषदेत योगी आदित्यनाथ म्हणाले की, समाजवादी पक्षाचा एक नेता आहे, त्या मुर्खाला औरंगजेब चांगला वाटतो. तो औरंगजेबाला त्याचा आदर्श मानतो. जर तुमच्यात हिंमत असेल तर त्याला पक्षातून बाहेर हकला. समाजवादी पक्षाने त्याच्या विधानावर स्पष्टीकरण द्यावे. अशा लोकांना उत्तर प्रदेशात पाठवा, आम्ही त्यांच्यावर योग्य उपचार करू, उत्तर प्रदेशात अशा लोकांवरील उपचारासाठी जास्त विलंब केला जात नाही असं सांगत योगींनी अबु आझमींना टार्गेट केले.
योगी आदित्यनाथ इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी समाजवादी पक्ष औरंगजेबाला हिरो समजतो. समाजवादी पक्षाचं त्यांच्या आमदारांवर नियंत्रण नाही. औरंगजेबाने भारतीयांच्या आस्थेवर प्रहार केला होता. समाजवादी पक्षाला भारतीय वारसेचा अभिमान नाही.
कमीत कमी ज्यांच्या नावावर तुम्ही राजकारण करता त्यांचे तरी ऐका. डॉक्टर लोहिया म्हणाले होते, भारतीय संस्कृतीचा आधार भगवान राम, कृष्ण आणि शंकर हे आहेत. आज समाजवादी पक्ष लोहिया यांच्या विचारापासून दूर गेला आहे. आज ते औरंगजेबाला आदर्श मानतात असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सभागृहात म्हटलं आहे.
योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, एकीकडे तुम्ही महाकुंभावर टीका करत आहात. दुसरीकडे औरंगजेबचे कौतूक करत आहात. त्या औरंगजेबने देशातील मंदिरे नष्ट केली. तुम्ही त्या आमदारावर कारवाई का नाही करत? त्याच्या वक्तव्याचा निषेध का नाही करत? असा प्रश्न योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाला विचारला.
दरम्यान, औरंगजेबाच्या बाप शाहजहाने स्वत: लिहिलं होतं, “खुदा करे ऐसी औलाद किसी को न दे.. तुम्ही शाहजहाचं चारित्र वाचा, औरंगजेब भारताच्या आस्थेवर प्रहार करण्यासाठी आला होता. तो भारताचं इस्लामीकरण करण्यासाठी आला होता. कुणीही सभ्य व्यक्ती त्यांच्या पोराचं नाव औरंगजेब ठेवत नाही असा टोलाही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लगावला आहे.