School Timing Change : राज्यातील चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरणार, राज्य सरकारचे आदेश जारी…

School Timing Change : राज्यातील शाळा संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे सरकारने राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग आता सकाळी ९ किंवा ९ वाजेनंतर भरवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शासन परिपत्रकही जाहीर करण्यात आलं आहे.
राजभवन येथे झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याच्या सूचना केल्या होत्या. राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळा विशेषतः खासगी शाळांचे पुर्व माध्यमिक ते इयत्ता ४ थीचे वर्ग सकाळी ७ वाजता भरतात. त्यामुळे रात्री उशीराने झोपत असलेले विद्यार्थी सकाळी शाळेत जाण्यासाठी लवकर उठतात.
त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नसल्याने त्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत असल्याने शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे सकाळच्या सत्रातील वर्ग सकाळी ९ नंतरच भरवले जावेत असे निर्देश दिले आहेत. School Timing Change
या निर्णयामुळे आता राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधिल पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे सकाळच्या सत्रातील वर्ग सकाळी ९ नंतरच भरवले जाणार आहेत. या निर्देशाचे पालन करण्याची जबाबदारी संचालकांवर सोपवण्यात आली आहे.
शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन अध्यापनाच्या निश्चित केलेल्या कालावधीत कोणतीही बाधा येणार नाही, याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी.
ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळांची वेळ बदलणे अगदीच शक्य होत नसेल त्यांच्या अडचणी प्रकरण परत्वे संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी/ शिक्षण निरीक्षक (प्राथमिक) यांनी मार्गदर्शन देऊन सोडविण्याची तजवीज करावी. यासाठी संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने आपल्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी/ शिक्षण निरीक्षक (प्राथमिक) यांच्याशी संपर्क साधून प्रकरण परत्वे मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावी, असेही या परिपत्रकानुसार स्पष्ट करण्यात आले आहे.