“आम्हाला वाचवा, आम्ही सुरक्षित नाही “; इराणमध्ये अडकलेल्या 110 भारतीय विद्यार्थ्यांची मदतीसाठी आर्त हाक..

मुंबई : इराण आणि इस्त्राईल यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षाची झळ आता तिथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर बसली आहे. इराणमधील उर्मिया शहरात तब्बल 110 भारतीय विद्यार्थी अडकले असल्याने त्यांनी मदतीसाठी आर्त हाक दिली आहे.आमच्या घरापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर बॉम्बस्फोट होत आहेत, आम्ही सुरक्षित नाही, अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी आपली भीती व्यक्त केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, उर्मियात अडकलेले 110 विद्यार्थी उत्तर प्रदेश, बिहार, केरळ, मुंबई, पुणे आणि काश्मीर अशा विविध भागांतील आहेत.विद्यार्थी ज्या ठिकाणी राहत आहेत त्या काही अंतरावरच मोठमोठे बॉम्बस्फोट होत असल्याने या ठिकाणी आम्ही सुरक्षित नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान भारतीय दूतावास सध्या तेहरान आणि शिराझमधील विद्यार्थ्यांना कोम शहरात हलवण्याचे प्रयत्न करत आहेत.
यातील अडकलेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या युद्धाचा भडका अतिशय भयंकर आहे.आम्ही दूतावासाच्या संपर्कात आहोत, पण त्यांनी आम्हाला सध्या स्वतःची काळजी घेण्यास सांगितले आहे. आमची विनंती आहे की, जसे सरकारने यापूर्वी आम्हाला संकटातून बाहेर काढले, तसेच आताही आमची इथून सुटका करावी.” अशी मदतीची हाक त्यांनी महाराष्ट्र सरकारला केली आहे.

युद्धाच्या आधी भारतीय दूतावासाने तेथील विद्यार्थ्यांना दोनदा इराण सोडण्याच्या सूचना जारी केल्या होत्या. मात्र, अनेक विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू असल्याने आणि त्याच वेळी विमान तिकिटांचे दर भयंकर वाढल्याने अनेक विद्यार्थी मायदेशी परतू शकले नाहीत. आता युद्ध भीषण झाल्याने विमानांची वाहतूक विस्कळीत झाली असून विद्यार्थी तिथेच अडकून पडले आहेत.
