सरपंच संतोष देशमुख खूनाचा गुन्हा हा कंटिन्यू क्रिमिनल कॉन्सपरन्सी ! सरकारी वकिल उज्वल निकम यांचा परळी कोर्टात युक्तिवाद ! कोर्टात आरोपींच्या आरोप निश्चितीसाठी मागणी ….


बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खटल्याची सुनावणी बीड कोर्टात आजपासून सुरू झाली आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज कोर्टामध्ये युक्तिवाद केला. सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचा संपूर्ण घटनाक्रम त्यांनी कोर्टात सांगितला. ही घटना कंटिन्यू क्रिमिनल कॉन्सपरन्सी (गुन्हेगारी कट)असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.

घटनेची सुरुवात ८ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू होते आणि देशमुख यांचे अपहरण आणि खून ९ डिसेंबर २०२४ पर्यंत होतो असे उज्ज्वल निकम यांनी कोर्टात सांगितले. आरोपींच्या वकिलांकडून काही कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती, ती देखील पूर्ण करण्यात आल्याचे निकम यांनी सांगितले. पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे.

आज संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित होते. आरोपीचे वकील आणि उज्ज्वल निकम यांच्यात छोटासा युक्तिवाद झाला. यावेळी ही केस आरोप निश्चितीसाठी तयार असल्याचे उज्ज्वल निकम यांनी म्हटले. त्यावर आरोपीच्या वकिलांनी आरोप निश्चितीची घाई करू नये असा आक्षेप घेतला. अद्याप आम्हाला सगळी कागदपत्रं मिळालेली नाहीत त्यामुळे आरोप निश्चिती आत्ताच नको असे आरोपीच्या वकिलांनी म्हटले. सुनावणीनंतर ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पत्रकार परिषदेत कोर्टात काय झाले ते सांगितले.

याबाबत उज्ज्वल निकम म्हणाले, जगमित्र ऑफिस परळीला आहे, तिथे वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी आवादा कंपनीकडून दोन कोटींची खंडणी मागण्याचे निश्चित केले. त्यांनी कंपनीच्या मॅनेजरला (शिवाजी थोपटे) धमकी दिली. शिवाजी थोपटेने दिल्लीच्या अधिका-याला कळवले. दिल्लीच्या अधिका-यांनी कळवले की पोलिसांत तक्रार करू नका. त्यानुसार पोलिसांत तक्रार केली नाही. कारण हे खूप मोठे लोक आहेत, असे त्यांना सांगण्यात आले. याचे सर्व सीडीआर आणि कॉल रेकॉर्ड कोर्टात देण्यात आले आहे.

उज्ज्वल निकम म्हणाले, संतोष देशमुख यांची हत्या हा कट आहे. तो कसा-कसा शिजत गेला याची तारखेसह माहिती आम्ही कोर्टाला दिली आहे. ८ ऑक्टोबर २०२४ ते ९ डिसेंबर २०२४ असा हा घटनाक्रम आहे. हा कट म्हणजे कंटिन्यू क्रिमिनल कॉन्सपरन्सी आहे.

सुनील शिंदे याने कॉल रेकॉर्डिंग केले आहे. त्यामुळे वाल्मिक कराडचा यामध्ये संबंध असल्याचे पुरावे आहेत. सुदर्शन घुलेने पुन्हा धमकी दिली, की वाल्मिक कराड सांगतो तसे वागा, नाही तर कंपनी बंद केली जाईल. सुदर्शन घुले, विष्णू चाटे, फरार आरोपी कृष्णा आंधळे यांची गँग असल्याचा आरोप निकम यांनी केला.

आरोपींची संपत्ती जप्त करण्यात यावी
दोन प्रमुख मागण्या आज कोर्टात करण्यात आल्या. यामध्ये पहिली मागणी, महत्त्वाच्या साक्षीदारांची ओळख गोपनीय ठेवावी आणि दुसरी मागणी कोर्टाकडे करण्यात आली की, संतोष देशमुख खटल्यातील काही आरोपींची प्रॉपर्टी संघटित गुन्हेगारी कायद्याखाली जप्त करावी. या दोन प्रमुख मागण्या आज कोर्टाला करण्यात आल्याचे निकम यांनी सांगितले.

संतोष देशमुख खटला दोन गोष्टींवर अवलंबून : उज्ज्वल निकम

ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला हा प्रमुख दोन गोष्टींवर अवलंबून आहे. ९ डिसेंबर २०२४ ला संतोष देशमुख यांना पळवून नेण्यात आले. त्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. या खटल्यातील दुसरी महत्त्वाची बाब आहे परिस्थितीजन्य पुरावे. या दोन्हीवर हा खटला आधारित आहे. काही कागदोपत्री पुरावे आहेत. काही सायंटिफिक पुरावे आहेत. एसआयटीने योग्य परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले आहेत. मनुष्य बदलू शकतो मात्र परिस्थितीजन्य पुरावे कधी खोटं बोलत नाहीत, असेही उज्ज्वल निकम म्हणाले.

गँग लीडर सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या इशा-यानुसार कसा काम करत होता, याचे सर्व ऑडिओ, व्हीडीओ पुरावे, सीडीआर आम्ही कोर्टाला दिले आहेत. त्यानुसार आम्ही पुढील तारखेला (१० एप्रिल २०२५) आरोपींविरोधात कोणते चार्ज फ्रेम करावे यासाठीचा अर्ज देणार असल्याचे उज्ज्वल निकम यांनी सांगितले

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!