शिंदे गटाच्या फुटीवर संजय राऊत यांचे मोठे विधान, म्हणाले, तेव्हाच ‘उदय’ होणार…

मुंबई : राज्याचा राजकरणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी पूर्वीच शिंदे गटात मोठी फूट पडणार होती. उदय सामंत हे शिंदे गटापासून वेगळे होणार होते.

त्यांच्या सोबत २० आमदारही होते, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. महायुतीचं सरकार आलं तेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे आडून बसले होते, त्यामुळे उदय सामंत यांना घेऊन सरकार बनवण्याचा भाजपचा प्लान होता, असे संकेतच राऊत यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसला गेले आहेत. जाण्यापूर्वी त्यांनी पालकमंत्रीपदाची घोषणा केली आहे. आपल्या गळ्यात पालकमंत्रीपदाची माळ नाही पडल्याने अनेक मंत्री नाराज आहेत. रायगडमध्ये तर भरत गोगावले यांच्या समर्थकांनी जाळपोळही सुरू केली आहे.

त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगावात गेले आहेत. शिंदे महायुती सरकारवर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. त्यावरून संजय राऊत यांनी शिंदे यांना खोचक टोले लगावले आहेत. नाराजीचे कारण राज्याला कळले पाहिजे.
लहान मूल रुसावे आणि कोपऱ्यात जाऊन बसावं तसा हा प्रकार आहे. पण नाराजीचे कारण नक्की काय आहे? पद, पैसा, प्रतिष्ठा, खंडणी… नेमकं काय आहे? कळलं पाहिजे आम्हाला, असे संजय राऊत म्हणाले.