कोकणात ९०० कोटींच्या जमिनीचा व्यवहार; ‘महान हिंदुत्ववादी मंत्री’वर संजय राऊतांचा गंभीर आरोप, नवा गौप्यस्फोट


मुंबई : राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी सिंधुदुर्गातील कथित ९०० कोटी रुपयांच्या जमीन व्यवहारावरून गंभीर आरोप केले आहेत. वेंगुर्ला, सावंतवाडी आणि दोडामार्ग या तीन तालुक्यांतील मोठ्या प्रमाणातील शेतजमीन आणि कृषी जमीन बंगळुरू, दिल्ली आणि हैदराबाद येथील धनिकांना कथितरीत्या बेकायदेशीर पद्धतीने विकण्यात आल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. शेतकरी नसलेल्या व्यक्तींना ही जमीन विकण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

या संपूर्ण व्यवहाराची महसूल विभागाकडून गेल्या तीन वर्षांपासून चौकशी सुरू असल्याचे राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्रात तुकडेबंदी कायदा लागू असताना कोकणातील या तीन तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन विक्रीचे व्यवहार कसे झाले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, या जमिनींचा ताबाही बाहेरील व्यक्तींनी घेतल्याचा दावा त्यांनी केला.

सिंधुदुर्गातील मंत्रिमंडळातील नेत्यांवरही राऊत यांनी थेट आरोप केले. कोकणातील काही नेते या व्यवहारात परप्रांतीयांचे भागीदार बनून काम करत असल्याचा दावा त्यांनी केला. या जमीन व्यवहाराची किंमत तब्बल ९०० कोटी रुपये असल्याचे सांगत या भागात जंगलतोड सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाची पाहणी करण्यासाठी आपण स्थानिक शिवसैनिकांसह सिंधुदुर्गात जाणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

काही काळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीही हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, त्यानंतरही सिंधुदुर्गातील कथित जमीन व्यवहार थांबले नसल्याचा दावा राऊत यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची आपल्याकडे माहिती असल्याचे सांगत कोणत्या व्यक्तीने किती पैसा कुठे गुंतवला आहे, याची माहिती असल्याचा दावा त्यांनी केला.

फडणवीस सरकारने आतापर्यंत झालेले जमीन व्यवहार कोणाच्या नावावर झाले आहेत, हे जाहीर करावे, अशी मागणी राऊत यांनी केली. तसेच या व्यवहारामागचा सूत्रधार कोण आहे आणि मंत्रिमंडळातील कोणता मंत्री किंवा आमदार या जमीन व्यवहारात दलाली करत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

‘९०० कोटी हा काही सामान्य आकडा नाही’

कोकणातील शेतकऱ्यांच्या जमिनी बाहेरील व्यक्तींना विकण्याच्या व्यवहारात मंत्रिमंडळातील कोणता मंत्री सहभागी आहे, असा सवाल राऊत यांनी केला. संबंधित व्यक्ती इस्टेट एजंटप्रमाणे काम करत असल्याचा आरोप करत त्याला किती कोटी रुपयांची दलाली मिळाली, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.

या संपूर्ण प्रकरणात कोण-कोण सहभागी आहे, याची माहिती समोर यायला हवी, असे राऊत म्हणाले. ‘९०० कोटी हा काही सामान्य आकडा नाही’, असा दावा करत या व्यवहारातील आर्थिक बाबींवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!