Sanjay Gaikwad : शिवसेना शिंदे गटाच्या आमदारासह दोन केंद्रीय मंत्री अडचणीत, काँग्रेसची तक्रार, नेमकं कारण काय?

Sanjay Gaikwad : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी संजय गायकवाड यांच्याविरोधात दिल्लीत तक्रार करण्यात आली आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परदेशात असताना आरक्षणासंदर्भात एक विधान केले होते. त्या वक्तव्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी टीका केली होती.
काँग्रेसचे उपाध्यक्ष अजय माकन यांनी एनडीएच्या चार नेत्यांविरोधात दिल्लीच्या तुघलक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्यासह दोन केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे.
बुलढाणा येथील पत्रकार परिषदेत बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते की “काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. राहुल गांधी यांचे वक्तव्य हा जनतेचा सर्वात मोठा विश्वासघात आहे. राहुल गांधी हे संविधानाचे पुस्तक दाखवून भाजप ते बदलून टाकेल असे खोटं नॅरेटिव्ह पसरवतात. Sanjay Gaikwad
पण प्रत्यक्षात देशाला ४०० वर्षे मागे नेण्याची काँग्रेसची योजना आहे. मराठा, धनगर आणि ओबीसी सारखे समाज इथं आरक्षणासाठी लढत आहेत, पण ते देण्याऐवजी राहुल गांधी त्यांचे आरक्षणाचे लाभ संपवण्याची भाषा करत आहेत. त्यांची जीभ कापणाऱ्याला मी ११ लाख रुपये बक्षीस देईन, असं आमदार संजय गायकवाड यांनी म्हंटले होते.